आरे आपुनबी शेतकरीच ना, आपल्याला वाली कोण?

आरे आपुनबी शेतकरीच ना, आपल्याला वाली कोण?
आरे आपुनबी शेतकरीच ना, आपल्याला वाली कोण?
आरे आपुनबी शेतकरीच ना, आपल्याला वाली कोण?esakal

(सदरील कथेचा आणि त्यातील पात्रांचा कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी संबंध नाही. तसे आढळल्यास तो योगा योग समजू नये. तरीही ही कथा काल्पनिक आहे.)

"तात्या कुठं निघाले..."

"औरंगाबादला चाललो", गाडी थांबवत तात्या म्हणाले.

"आरं पण औरंगाबाद बंदहे म्हणते आज", असं म्हणत पाणी तुंबलेल्या शेतातून संतू बाहेर आला.

"आरं काय आता परत लॉकडाऊन लागलं का काय" असा प्रश्न विचारत तात्यांनी गाडी झाडाखाली घेतली.

"लॉकडाऊन नई ते तिकडं शेतकऱ्यांला मारलं म्हणते", त्याच्यामुळं वातावरण तापलं.

"आर मंग जवुदी मला, शेतकऱ्यासाठी कोण बंद ठु राहिलं" हासत हासत तात्यानं गाडीला सेल्फ मारला.

"ओ तात्या कशाला रिकामे कामं करता आत्ता फोनवर पाह्यलं म्या, काही ठिकाणी मारलं बी म्हणते लोकायला", संतू गरबडीत जवळ आला...

"आरं पण आपल्याला काह्याला मारतीन, मी बी शेतकरीचे ना"

तात्या पुन्हा हासत म्हणाले.

"तुम्ही गण बागायतदार ह्ये पण त्यायला कुठं कळतं त्ये" असं म्हणत संतूनं दुमडलेली पँट खाली केली.

"आरं ते आमच्या सोन्याला भेटून यावं म्हणलं आज, यमपीयशीच्या पेपरच्या तारखा आल्या तेच्या. त्यो कही घरी यणार नई म्हणला, म्हणून म्हणलं आपण उभ्या उभ्या चक्कर मारून याव", अस म्हणाले अन तात्यानं गाडी स्टँडवर लावली.

"मायला यंदा कई खरं दिसत नही भो", दोघही कमरेवर हात ठेवून शेताकडं पाहात उभं राहिले असताना संतुच्या तोंडातून निघालं, त्यावर तात्या म्हणले "यंदाचं साल ब्येक्कारच दिसतं जरा, दरसाल भाजून जातो, यंदा भिजून 'गेले' मालं सगळे."

"नही पण हे देणार म्हणते भो मदत, कितीतरी कोटी केलेबी म्हणते लगे मंजूर", तात्याकडं पाहत संतू म्हणला.

पांढऱ्या केसावर हात फिरवत तात्या म्हणाले, "कई भेटत नसतं संतू, जिंदगी गेली आमची हे ऐकू ऐकू, अन जे भेटतं ते येईन तोह्या तेराव्याच्या दिशी...." एवढ्यावर थांबत तात्या लगेच म्हणाले, "काय म्हणला तू कुठं मारलं शेतकऱ्याला?"

आरे आपुनबी शेतकरीच ना, आपल्याला वाली कोण?
तिसऱ्या लाटेसाठी खबरदारी, 6000 टन ऑक्सिजनची तयारी

"तिकडं यूपीत झालं नई का ते" संतू म्हणला.

त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच तात्या म्हणाले "आरे हा, ते मंत्राच्या पोरानं मारलं म्हणते त्येच ना" तात्या बोलत असतानाच

संतून होकारार्थी मान हलवली अन् फोन काढत म्हणला "चला यु नदीकुन चक्कर मारून, उद्या जा आता औरंगाबादला."

दोघही संतुच्या शेतातून जात असताना, तात्यानं सडलेलं कपाशीचं बोंड हातात घेतलं आणि म्हणाले, "कशाला आला तू इथं संतू, आमच्या जिंदग्या गेल्या येच्यात, जा तिकडं नौकऱ्या करा सावलीत..."

संतू म्हणला, "तात्या नौकऱ्या तरी कुठं उरल्या आता, डिग्र्या घेऊन हिंडू रायले पोऱ्ह, इथंच कही तरी करू आपल्या वावरात नवं."

हे ऐकताच तात्यांच्या डोक्यात शहरात असलेल्या पोराचा विचार आला अन् नदीच्या थडीवर उभं असलेले तात्या जरा शांत झाले.

तेवढ्यात संतुच्या फोनमधून बातम्यांचा आवाज आला, "पुढची बातमी थेट जळगावहून, जळगावमध्ये महाराष्ट्र बंदला गालबोट लागलंय. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात तुफान हाणामारी झाली असून, काही कार्यकर्ते जखमी देखील झाल्याचं कळतंय."

हा आवाज ऐकताच पुराच्या पाण्याकडे पाहणारे तात्या अन संतू दोघही संतुच्या फोनमध्ये डोकावू लागले.

"यव्हढी मारहाण करू कशाला राह्यले पण ह्ये," तात्या म्हणाले.

"तात्या शेतकऱ्याच्या साठी बंद ठुला त रहू द्यायचं न बंद यक दिवस, हे विरोधीपक्षावाले बी भलते नाटकं करते", चिडून संतू म्हणला.

थोडा वेळ शांत बसलेले तात्या नंतर म्हणाले, "शेतकऱ्यासाठी अन गोरगरीब लोकायसाठी यव्हढं जर या झेंडे घेऊन फिरनाऱ्यायचं प्रेम उतू गेलं असतं, त तोह्या बापावर आत्महत्या करायची येळ नसती आली, येच्यातलं कोण्हीच आपलं नई रे बबा." तात्या अस म्हणले अन् दोघही उठले.

"आरे आपुनबी त शेतकरीच हाये ना, आपलं काय? आपल्याला वाली कोण, ह्ये आपले पिकं पाण्यात गेले, डोळ्यासमोर व्हत्याचं नव्हतं झालं, आपल्यासाठी कहून उतरू नई राहिलं कोणी रस्त्यावर, आपल्यासाठी कहून फोडीना कोण्ही कोन्हाचे डोके. "

हे ऐकताना संतू निशब्द होता...

दोघही पुन्हा पाण्यानं सडलेली कपाशी, सोयाबीन, मका अन मावळलेल्या सुर्याकडं पाहात पाहात रस्त्याकडं निघाले.

दुसऱ्या दिवशी तात्या आपल्या शहरात असलेल्या मुलाकडं जायला निघाले, अन पारावर बसलेला संतू तात्याला हाक मारत, वर्तमानपत्र घेऊन तात्याकडं पळत आला.

त्यानं पेपरच्या 2-3 नंबरचं पान काढलं, आणि एका हातानं कोपऱ्यातली बातमी दाखवली. ती बातमी पाहून तात्यानं संतूकड पाहिलं आणि काहीच न बोलता गाडीला सेल्फ मारून निघून गेले.

तात्या दूर जाईपर्यंत संतु गाडीकडं पाहात राहिला आणि नंतर त्याने तो पेपर नेऊन पारावर नेऊन ठेवला.

मी पळत जाऊन वर्तमानपत्राचं तेच पान काढलं आणि ती बातमी पाहिली.

ती बातमी होती, "जिल्ह्यात काल दिवसभरात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या."

- सुधीर काकडे (9823321500)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com