मराठवाड्याला पाणी मिळणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

मुंबई - मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आज गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला आज दिले.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या मुद्यावर राजकारण तापले असतानाच प्राधिकरणाच्या निर्णयामुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. 

मुंबई - मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आज गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला आज दिले.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याच्या मुद्यावर राजकारण तापले असतानाच प्राधिकरणाच्या निर्णयामुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. 

राज्यातील कोणत्याही धरणातून पाणी सोडताना प्रकल्पातील क्षमतेच्या ३० ते ३५ टक्‍के पाण्याची गळती किंवा नासाडी होत असते. धरणातून पाणी सोडताना ही गळती ग्राह्य धरावी, असे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र गळतीच्या पाण्याव्यतिरिक्‍त एकूण साठवण क्षमतेचा विचार करून पाणी सोडल्यास शेतकऱ्यांचा रोष कमी होईल, असे महामंडळाचे म्हणणे आहे. या संदर्भात महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. समन्यायी पाणीवाटपाच्या सूत्रानुसार १५ ऑक्‍टोबर रोजी धरणातील पाणीसाठा तपासला जातो. या पार्श्‍वभूमीवर सध्या जायकवाडी धरणात ६५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी साठा आहे. म्हणजेच पाणीवाटपाच्या सूत्रानुसार सात टीएमसी पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून पाणी सोडण्याची मराठवाड्याची मागणी आहे. या संदर्भात गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपत्ती प्राधिकारणाकडे मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावर पाण्याची नासाडी ग्राह्य न धरता पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणाने महामंडळाला दिल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येते.

महामंडळाला काही शंका होत्या. त्या शंकांचे निरसन प्राधिकरणाने केले आहे. कोणत्या धरणातून किती पाणी सोडावे, याचे सर्व अधिकार कार्यकारी संचालकांना आहेत. पिण्यासाठी, शेती आणि उद्योगांच्या पाण्याचे नियोजन त्यांनी करावे, तसेच पाणीवाटपाच्या सूत्रानुसार पाणी सोडण्याचे त्यांना आदेश दिले आहेत.
- के. पी. बक्षी, अध्यक्ष, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण

Web Title: Marathwada will get water