विवाहित मुलीला वडिलांच्या व्यवसायातही वाटा; उच्च न्यायालयाचा निकाल

विवाहित मुलीला वडिलांच्या व्यवसायातही वाटा; उच्च न्यायालयाचा निकाल

मुंबई - विवाहित मुलीला वडिलांच्या व्यवसायामध्येही वाटा मिळू शकतो, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. वडिलांचा व्यवसाय मुलगा सांभाळत असला, त्याबाबतचे ताळेबंदही तो ठेवत असला, तरी मुलीच्या अधिकारावर आक्रमण होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

पुण्यातील वसंत पुरो (नाव बदललेले आहे) यांनी दोन मुद्द्यावर दाखल केलेली याचिका न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांनी नुकतीच नामंजूर केली. बहिणीचे लग्न झाल्यामुळे तिला वडिलांच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळू शकत नाही, असा दावा त्यांनी केला होता. वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायावरही तिचा अधिकार नाही. कारण पहिल्यापासून मी तो व्यवसाय सांभाळत आहे, असेही पुरो यांचे म्हणणे होते. याविरोधात त्यांनी स्थानिक न्यायालयातही दावे केले होते; मात्र कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा दावा अमान्य करून व्यावसायिक मालमत्तेमध्ये कोर्ट कमिशनरची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी पुरो यांनी केली होती. 

पुरो यांच्या वडिलांचे विश्रांतिगृह होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी ती जागा मूळ मालकाला परत केली होती; मात्र विश्रांतिगृहातील सामान व अन्य आर्थिक मालमत्तेवर त्यांच्या बहिणीने, तसेच भावाने हक्क मागितला होता. बहिणीने यापूर्वी हॉटेलचा परवाना काढण्यात हरकत घेतली नव्हती. त्यामुळे ती आता आक्षेप घेऊ शकत नाही, असा पुरो यांचा युक्तिवाद होता; मात्र तो न्यायालयाने अमान्य केला. 

विवाहितेला सर्व मालमत्तांमध्ये अधिकार! 
घरातील मोठा मुलगा म्हणून हॉटेलचा परवाना त्याच्या नावावर झाला, तरी बहिणीला हक्क नाकारण्याचे ते पुरेसे कारण नाही. विवाहित मुलींना वारसा हक्काने वडिलांच्या सर्व मालमत्तांमध्ये अधिकार आहे, असे मत नोंदवत न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com