रुग्णांनो, काळजी करू नका; मंत्रालयातील वैद्यकीय मदत केंद्र सुरू राहणार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

अर्जाची छाननी करण्याची कार्यवाही करण्याकरिता लागणारा अनुभवी, आवश्यक अधिकारी, कर्मचारीवृंद त्वरित उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

मुंबई : सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित राहावे लागणार नाही. तसेच राज्यात जोपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू असेल, तोपर्यंत गरजू रुग्णांना उपचार आणि शस्त्रक्रियेकरिता अर्थसहाय्य करण्यात ही यंत्रणा मदत करणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय बुधवारी (ता.20) जाहीर करण्यात आला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट ५८१ समान उपचार पद्धती वगळून उर्वरित आजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याबाबत अर्जांची छाननी करतील. आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता तपासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती पात्र अर्जांची शिफारस करेल.

- पुणेकरांनी सुचवलेल्या 'त्या' 450 हरकतींवरील सुनावणीस सुरवात

अर्जाची छाननी करण्याची कार्यवाही करण्याकरिता लागणारा अनुभवी, आवश्यक अधिकारी, कर्मचारीवृंद त्वरित उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुख्य कार्यकारी अधिकारी हे अर्जांची स्वीकृती, छाननी करतील, असे या शासन निर्णयात नमूद केले आहे.

- राज्य नाट्य स्पर्धेत प्रथमच यांची दमदार एंट्री

दरम्यान, काल जाहीर केलेल्या दुसऱ्या एका आदेशानुसार या यंत्रणेसाठी मंत्रालयीन संवर्गातील एक उपसचिव, एक कक्ष अधिकारी, एक सहायक कक्ष अधिकारी आणि एक लिपीक-टंकलेखक यांच्याकडे जबाबदारी असेल. इतर अनुभवी, आवश्यक अधिकारी, कर्मचारीवृंद त्वरित उपलब्ध करून देण्याची व्यवस्था अपर मुख्य सचिव (सेवा) हे उपलब्ध करून देणार आहेत.

- प्रिन्सच्या पालकांना मिळणार 10 लाख रुपये नुकसान भरपाई

रुग्णांनी याठिकाणी अर्ज सादर करावेत 

सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, जीवनदायी भवन, दुसरा मजला, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आवार (ESIS Hospital Compound), गणपतराव जाधव मार्ग, वरळी नाका, वरळी, मुंबई- ४०००१८, दुरध्वनी- ०२२- २४९९९२०३/०४/०५ याठिकाणी गरजूंनी आपले अर्ज सादर करावेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical assistance will be continue from CMRF in the Presidents rule in Maharashtra