
Balasaheb Thorat : 'तुमची नाराजी दूर झाली का?' बाळासाहेब थोरात म्हणाले...
मुंबईः थोरात-पटोले वादाच्या अनुषंगाने काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. उभय नेत्यांमध्ये बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली होती. त्यातच निवडणुकीतील अपक्ष विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. तसेच राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यातच थोरात यांनी आपल्या विधानसभेतील गटनेतेपदाचा राजीनामा दिला.
पक्षामध्ये गैरसमज झाले आहेत- एच.के पाटील
बैठकीनंतर एच. के. पाटील म्हणाले की, मी थोरातांचं पूर्ण ऐकून घेतलं. काही दिवसांपूर्वीच मी काँग्रेस अध्यक्षांना भेटलो होतो. याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच राज्यात झालेले गैरसमज त्यांच्यापर्यंत पोहोचवले. मागील काही दिवसांत झालेले गैरसमज काँग्रेस पक्षाचे कौटुंबिक आहेत. या समस्या लवकरच सोडवण्यात येतील. तसेच थोरात रायपूर येथे होणाऱ्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.
ही काँग्रेसची अंतर्गत बाब- बाळासाहेब थोरात
माझा राजीनामा ही काँग्रेसमधील अंतर्गत बाब आहे. माध्यमांनी त्याला मोठं स्वरुप दिलं. काँग्रेसच्या रायपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाला मी जाणार आहे. प्रत्येक संघटनेमध्ये प्रश्न असतात, आमच्याही आहेत. या प्रश्नांबाबात मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत चर्चा करावी, असं एच.के. पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ती चर्चा होईल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
यावेळी बाळासाहेब थोरात यांना, तुमची नाराजी दूर झाली का? असं पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी त्यावर बोलणं टाळलं. माझे प्रश्न काँग्रेसच्या बळकटीकरणासाठीच आहेत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.