
Nana Patole : महाविकास आघाडीच्या सभेला नाना पोटोले जाणार नाहीत ; 'हे' आहे कारण
छत्रपती संभाजीनगरः महाविकास आघाडीची आज छत्रपती संभाजी नगर येथे वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते. परंतु नाना पटोले हे या सभेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळतेय.
आजच्या ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सभेची पूर्ण तयारी झाली आहे. अवघ्या तासाभरात सभा सुरु होईल. परंतु या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती असणार नाही. एकीकडे उद्धव ठाकरे हे मुंबईहून रवाना झालेले आहेत. अजित पवारदेखील उपस्थित राहात आहेत. मात्र नाना पटोले उपस्थित राहणार नाहीत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकृती अत्यवस्थ असल्याचं कारण दिल्याची माहिती आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले असून अद्याप नाना पटोले यांनी थेटपणे कारण सांगितलेलं नाही. तिन्ही पक्षांपैकी एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष सभेला उपस्थित राहत नसल्याने महाविकास आघाडीमध्ये तू-तू..मैं-मैं.. सुरु असल्याच्या चर्चा आहेत.
वज्रमूठ सभेच्या आयोजनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सहभागी असले तरी सभेच्या यशस्वितेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून अधिक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सभेच्या ठिकाणी स्तंभपूजन, सभेचे निमंत्रण, कामाची पाहणी, सोशल मीडियावर कॅम्पेनिंग या सर्व गोष्टींत उद्धव ठाकरे गटाने पुढाकार घेतल्याचं दिसून आलं.