शरद पवारांचा निरोप घेऊन संजय राऊत मातोश्रीवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली. अवघ्या दहा मिनिटांची ही भेट केवळ 'सदिच्छा' भेट होती, असा दावा राऊत यांनी केला असला तरी या भेटीनंतर संजय राऊत थेट मातोश्रीवर पोहचले आहेत.  

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली. अवघ्या दहा मिनिटांची ही भेट केवळ 'सदिच्छा' भेट होती, असा दावा राऊत यांनी केला असला तरी या भेटीनंतर संजय राऊत थेट मातोश्रीवर पोहचले आहेत.  

आज दुपारी साडेबारा वाजता पवार माध्यमांशी बोलणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीबाबत उत्सुकता होती. राऊत अवघ्या दहा मिनिटांमध्ये ही भेट आटोपून सिल्व्हर ओकच्या बाहेर आले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांच्याशी चर्चा होणे स्वाभाविक आहे. शरद पवार यांनी राज्यातल्या अस्थिर परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. यावर पवार यांची भूमिका ठाम आहे.

भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरु असताना या भेटीला महत्त्व आहे. शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याविषयी माहिती मिळू शकली नाही. उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर संजय राऊत दाखल झाले. शरद पवारांशी सकारात्मक राजकीय चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत उद्धव ठाकरेंना देतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting of Sharad Pawar and Sanjay Raut