राज्यभरात दूध 'पेटले'; पुरवठा रोखून दूध रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

दुधाच्या पाच गाड्या फोडल्या
पुण्यात आज (सोमवार) पहाटे पाचच्या सुमारास 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या पाच गाड्या फोडल्या. क्रांती, माऊली, कृष्णाई, मातोश्री, सोनई दूध संघांना 'स्वाभिमानी'चा दणका. 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी गाड्या फोडत दुध रस्त्यावर ओतले.

पुणे : सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर लिटरमागे पाच रुपये जमा करत नाही, तोपर्यंत राज्यात दूधविक्री बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता. 15) रात्री बारापासून आंदोलन सुरू केले. राज्यातील अनेक भागात दूध पुरवठा रोखून दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला आहे. तर, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दूध उत्पादकांच्या वाहनांना पोलिस संरक्षण दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आङे. त्याचप्रमाणे मुंबईत दुधाचा साठा केल्यामुळे कोणतीही कमतरता भासणार नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध संकलन बंदला रविवारपासूनच वाळवा तालुक्‍यातील येवलेवाडी (ता. वाळवा) नजीक हिंसक वळण लागले. जिल्ह्यात पहिली ठिणगी पडली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे निघालेल्या दुधाच्या टॅंकरच्या काचा स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी येवलेवाडीनजीक फोडल्या. दगडफेक करून टॅंकरच्या समोरच्या काचा फोडून टॅंकरमधील दूध रस्त्यावर सोडले.

गाय दूध उत्पादकांच्या खात्यावर सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, यासाठी आजपासून दूध संकलन, तसेच वाहतूक बंदचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत दूध उत्पादक कृती समितीने एक दिवस संकलन बंद करण्यास मान्यता दिली आहे. या आंदोलनात गोकुळ दूध महासंघही सहभागी झाला आहे. शेट्टी म्हणाले, "शेतकऱ्यांची आत्महत्या हा चेष्टेचा विषय झाला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 35 रुपये खर्च येतो. मात्र, त्यांना लिटरला केवळ 15 ते 17 रुपये मिळतात. त्यामुळे हे आंदोलन हाती घेतले आहे. सर्वसामान्यांची काळजी असेल, तर त्यांना दूध पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनादेखील जगण्याचा अधिकार आहे. त्यांनाही त्यांचा उदरनिर्वाह चालवायचा आहे. दुधाचा धंदा परवडत नाही म्हणून दूध विकायचेच नाही. त्यांनी हा निर्णय घेतला, तर मग त्यात त्यांचे चुकले कुठे?'' 

मंदिरात अभिषेक करून आंदोलन
नाशिक जिल्ह्यात दूध दर आंदोलनाला सुरवात झाली असून, टाळकुटेश्वर महादेव मंदिरात अभिषेक करुन आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करत आता मुंबईकडे जाणारे दूध रोखण्यात येणार आहे.

पंढरपूरमध्ये मोठा प्रतिसाद
स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध दर आंदोलनाला पंढरपूर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. पंढरपूर तालुक्यातील सुमारे 110 प्राथमिक दूध सोसायटयांनी दूध संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठींबा दिला आहे. पंढरपूर येथील दूध संकलन केंद बंद ठेवण्यात आले आहे.

दुधाच्या पाच गाड्या फोडल्या
पुण्यात आज (सोमवार) पहाटे पाचच्या सुमारास 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या पाच गाड्या फोडल्या. क्रांती, माऊली, कृष्णाई, मातोश्री, सोनई दूध संघांना 'स्वाभिमानी'चा दणका. 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी गाड्या फोडत दुध रस्त्यावर ओतले.

कुत्र्यांना दूध पाजून आंदोलन
बुलडाणा जिल्ह्यातील कोथळी येथे दूध उत्पादकांनी कुत्र्यांना दूध पाजून केले अभिनव आंदोलन केले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे.  बुलडाणा जिल्हा पोलिस पाटिल संघटनेचाही आंदोलनाला पाठिंबा असल्याची जिल्हाध्यक्ष विठ्ठल मनोहर पाटील यांनी माहिती दिली.

 

Web Title: Milk Agitation swabhimani shetkari sanghtna agitation for milk rate in Maharashtra