दुष्काळाने दूध आटले अन् खवा उत्पादन घटले

दुष्काळाने दूध आटले अन् खवा उत्पादन घटले

भूम (जि. उस्मानाबाद) : चारा-पाणी टंचाई, वाढत्या तापमानामुळे येथील दुग्धोत्पादन घटल्याने खवा उत्पादन निम्म्यावर आले आहे. एकेकाळी दरररोज 15 टन खवा उत्पादन करणाऱ्या या तालुक्‍यात सध्या 10 टन उत्पादन होत आहे. सध्या यात्रा, उत्सवाचे दिवस असून, मागणीप्रमाणे खवा पुरवठा करणे अवघड झाले आहे.

भूम तालुक्‍यात शेतीला जोडव्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दुग्धोत्पादनाकडे वळले आहेत. येथील खवा प्रसिद्ध आहे. त्यामुळे राज्यातील जेजुरी, पैठण, सातारा, शिर्डी, नाशिक, आंध्र प्रदेशातील हैदराबाद आदी शहरांत खव्याला मोठी मागणी आहे. यंदाच्या दुष्काळामुळे दूध व खवा व्यवसायावर मर्यादा आल्या आहेत.

यापूर्वी खासगी व शासकीय दूध योजनेत दररोज तीन ते साडेतीन लाख लिटर दूध संकलन होत होते. या वेळी दुभत्या पशुधनास मुबलक चारा व पाणी मिळणे मुश्‍कील झाले आहे. त्यातच तापमानवाढीचाही परिणाम होत आहे. या स्थितीमुळ सध्या केवळ दोन लाख लिटर दूधसंकलन होत आहे. अधिकचा भाव देऊनही दूध मिळत नसल्याने खवा, पेढा उत्पादन घटल्याचे उत्पादक सांगत आहेत. 

चारा छावण्यांना विलंब

भूम तालुक्‍यात जानेवारीपासून चारा, पाण्याचा प्रश्‍न जाणवू लागला. सध्या तो गहन बनला आहे. चारा छावणी सुरू होण्यासही विलंब झाला. काही शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात दुभती जनावरे विकली. सध्या सुरू असलेल्या चारा छावणीत 32 हजार पशुधनास आधार मिळाला आहे. उर्वरित 65 हजार पशुधन अडचणीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com