#MilkAgitation गोपालनाचे गणित जुळेना...

शिवाजी यादव
बुधवार, 18 जुलै 2018

दूध उत्पादकांची व्यथा; सांभाळण्याचा खर्च 450 रुपये, तर कमाई 380 रुपये

दूध उत्पादकांची व्यथा; सांभाळण्याचा खर्च 450 रुपये, तर कमाई 380 रुपये
कोल्हापूर - गाय सांभाळण्याचा खर्च दिवसाला साडेतीनशे ते साडेचारशे रुपये आहे. जर्सी गाय दिवसाला 15 ते 20 लिटर दूध देते. तिला पशुखाद्य 180 रुपये, वैरण 90, औषध 30 रुपये, अन्य देखभाल 50 रुपये, असा मिळून 450 रुपये खर्च येतो; तर दूध संघ 19 रुपये प्रतिलिटर दर देतो. त्याचे 380 रुपये मिळतात. यातही कधी फॅट कमी आले, तर रकमेत कपात होते. अशा अवस्थेत गायी पालनाचा धंदा परवडणार? असा प्रश्‍न दूध उत्पादक धोंडिराम डवरी यांचा आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच लाख गाय दूध उत्पादकांची ही व्यथा आहे. गायी पाळण्याचा हा धंदा आवाक्‍याबाहेर असल्याने गाईंना बाजार दाखविला जात आहे. पाच वर्षांपूर्वी दहा गाई घेतल्या, वर्षाला एक-दोन विकून गाईच्या दुधाचा व्यवसाय बंद केला, असेही डवरी यांनी सांगितले.

'गाय खरेदी केल्यानंतर लक्षात आले, की गायीच्या चांगल्या दूध उत्पादनासाठी तिला संमिश्र आहार द्यावा लागतो. ते खाद्य म्हशीच्या तुलनेत अधिक असल्याचे पहिल्या दोन महिन्यांतच जाणवले. गायीला फक्त ओली वैरण किंवा फक्त पशुखाद्य घालून चालत नाही. कारण त्याचा फॅटवर परिणाम होतो. सुरवातीला गाईला चौफेर आहार दिला. पुढे दूध डेअरीला घालताना 19 रुपये प्रतिलिटरप्रमाणे भाव मिळाला. यात कधी वैरण महाग, तर कधी पशुखाद्य महाग, अशी स्थिती होते, तसा खर्च वाढला. त्यात एका दिवसात एका गायीमागे शंभर रुपयांचा तोटा होतो. कोणी खासगीत दूध विकत घेतात, तेव्हा चार पैसे जरूर मिळतात. पण, त्यात सातत्य नसल्याने तिथे ठराविक दिवशी किमान भांडवली गुंतवणूक निघते व पन्नास-शंभर रुपये मिळतात.''

नफा कमीच
गाय आणि म्हशीची निगा राखण्यात, धार काढण्यात दिवस जातो. दुपारी अपवादात्मक स्थिती सोडली, तर विश्रांती मिळत नाही. एवढे करूनही आठवड्याला खर्च व येणाऱ्या पैशांचे गणित जुळत नाही. प्लंबरही दीड-दोन तास काम करून दिवसाला तीनशे-पाचशे रुपये तो मजुरी मिळवतो. यातही त्याच्या इच्छेनुसार काम असते. त्यामुळे दुधात व्यवसायापेक्षा कारागिरी बरी म्हणण्याची वेळ आली आहे, असे गोपालक संजय घोडके यांनी सांगितले.

Web Title: #MilkAgitation cow expenditure