#MilkAgitation शेट्टींचे आंदोलन दूध संघांसाठीच - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

कोल्हापूर - गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची मागणी करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांनी केलेले दूध बंद आंदोलन दूध संघांसाठीच होते, असा घणाघाती आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दूध संघांनी दूध दर आंदोलनापूर्वी जेवढा दर दिला होता, त्यात पाच रुपयांची वाढ करून द्यावी अन्यथा संघांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

मंत्री खोत म्हणाले, ‘‘कोल्हापुरातील अनेक दूध संघ गायीच्या दुधाला लिटरला २३ रुपये भाव देत होते. यातच आता शासन पाच रुपये अनुदान देणार आहे. त्यामुळे गोकुळ, वारणा, स्वाभिमानी या दूध संघांनी लिटरला २८ रुपये दर देणे अपेक्षित आहे. असे असताना बहुतांश संघांनी दोन रुपयांची वाढ करीत २५ रुपये दर जाहीर केले आहेत. त्यामुळे शासनाने दिलेल्या पाच रुपयांपैकी प्रतिलिटर तीन रुपयांच्या अनुदानावर डल्ला मारला जात आहे.’’

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शेतकऱ्यांचा इतकाच कळवळा असेल तर जिल्ह्यातील दूध संघांना २८ रुपये लिटरने दूध खरेदी करण्यास भाग पाडावे. जे संघ हा दर देणार नाहीत त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन मंत्री खोत यांनी खासदार शेट्टी यांना केले. पत्रकार परिषदेस रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘स्वाभिमानी’विरोधात नारा 
‘स्वाभिमानी’ने दूध संघाचा फायदा पाहून आंदोलन मागे घेतले. यावरून काळे बोके कोण? याचा शोध लागला आहे. या काळया बोक्‍यांचा पर्दाफाश करण्यासाठीच रयत क्रांती संघटना जनजागृती करणार आहे. शिरोळ तालुक्‍यातून जनजागृतीला सुरवात होणार असल्याचे सांगत मंत्री खोत यांनी खासदार शेट्टींवरील निशाणा स्पष्ट केला.

जवळ असला की पुण्यवान
मंत्री खोत म्हणाले, ‘‘केवळ निवडणुका जवळ आल्यानंतरच खासदार शेट्टी आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना भावनिक करतात. निवडणुकीत एकाला जवळ करायचे, दुसऱ्याला बाजूला ढकलायचे ही त्यांची पद्धत आहे. जवळ असणारा पुण्यवान, दूर गेला की अपवित्र अशी यांची नीती असून, त्याचा फटका माझ्यासह आमदार उल्हास पाटील यांनाही बसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: #MilkAgitation Raju Shetty Agitation Sadabhau Khot