#MilkAgitation दुधाची नाकेबंदी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

राज्यभरात शंभरहून अधिक टॅंकर व चार लाख लिटर दूध रोखले

राज्यभरात शंभरहून अधिक टॅंकर व चार लाख लिटर दूध रोखले
मुंबई - राज्यभरात मध्यरात्रीपासूनच सुरू झालेल्या दूध दरवाढीच्या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्याच्या विविध भागांतून दूध वाहतूक करणारे 100 हून अधिक टॅंकर व सुमारे चार लाख लिटर दुधाची नाकेबंदी केल्याचा दावा खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट पाच रुपये अनुदान जमा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेने पुकारलेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपवगळता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. शिवसेनेने आंदोलनात थेट उडी घेतली नसली तरी त्यांनी विरोधही केलेला नाही.

राज्याच्या विविध जिल्ह्यांत या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतल्याने खासगी व सहकारी दूध संघाच्या वितरण व संकलनावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. यामुळे पुढील दोन दिवस मुंबई व परिसरात दुधाची टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, दूध न मिळण्याच्या भीतीने मुंबईकरांनी आजच दुधाची अधिक बेगमी केली असून, नेहमीपेक्षा तीन लाख लिटर दुधाचा खप झाला.

मुंबईकरांपर्यंत उद्या दूध पोचू नये यासाठी राजू शेट्टी स्वत: मैदानात उतरले आहेत. अहमदाबादमधून मुंबईत दूध पोचू नये यासाठी पालघरमध्ये ते आज दिवसभर ठाण मांडून होते. राज्य सरकारनेही कडक पोलिस बंदोबस्तात मुंबईपर्यंत दूध पोचवण्याची व्यवस्था केली होती. त्यात काहीअंशी सरकारला यश आले असले तरी आज राज्यात दुधाचे दहा टक्‍केदेखील संकलन न झाल्याचा दावा शेट्टी यांनी केला. उद्या दुपारनंतर मुंबईला दूध मिळणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. राजू शेट्टी यांना या आंदोलनात हितेंद्र ठाकूर मदत करत आहेत.

राज्यभरात
- पंढरपूरला विठ्ठल-रुक्‍मिणीच्या प्रतीकात्मक मूर्तीला दुग्धाभिषेक करून राजू शेट्टींचे आंदोलन सुरू
- सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, वैजापूर, औरंगाबाद, नगर, अमरावती व बुलडाणा, जालना, बीड, उस्मानाबाद या ठिकाणी मध्यरात्री पासूनच आंदोलन
- गोकुळकडून दूध संकलन बंद
- अमूलचेही दूध संकलन नाही
- मदर डेरी, वारणा, चितळे आणि महानंदने दुधाचे संकलन केल्याची माहिती
- कऱ्हाडमध्ये यशवंतरावांच्या समाधीला दुग्धाभिषेक
- गुरांना, लहान मुलांना दुधाने अंघोळ
- जनावरांना, कुत्र्यांनाही दूध पाजले
- पुणे-बंगळूर महामार्गावरून मुंबईकडे दूध घेऊन निघालेल्या टॅंकरवर कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करीत दूध रस्त्यावर ओतले.
- सातारा महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून दुग्धविकासमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले
- नांदेडच्या निळा भागात राजहंसची दुधाची गाडी अडवून रस्त्यावर दूध ओतले.

राज्य सरकारबरोबर चर्चा करण्याची तयारी आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे आधार कार्ड आहे. त्यामुळे एक शेतकरी दुसऱ्या संस्थेतून सारखाच फायदा मिळवू शकत नाही. या सरकारनेच सगळ्या योजना डिजिटल करायचे ठरवले होते. पारदर्शकतेसाठीच सरकारने शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट अनुदान जमा करावे, त्यासाठी डिजिटायझेशनचा उपयोग करून घ्यावा.
- राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. शेतकऱ्यांनी दुधाची नासाडी करू नये आणि सामान्य नागरिकांना झळ पोचू नये याची काळजी घ्यावी.
- अशोक चव्हाण, प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष

खासगी दूध संघांनी खरेदी दर तीन रुपयांनी वाढविले. शेतकरी दूध ओतून देत नाही. आंदोलन करणारे दूध ओततात. हे शेतकरीविरोधी आंदोलन आहे. सरकार हे चालू देणार नाही.
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

मुंबईला नियमित दूध लागते : 46 लाख 61 लाख लिटर
मुंबईला सोमवारी दूध वितरित झाले : 49 लाख 51 लाख लिटर
मुंबईसाठी दुधाचा साठा : 90 लाख 9 लाख लिटर

Web Title: #MilkAgitation tanker raju shetty swabhimani shetkari sanghatana