हमीभावाच्या हरभऱ्याचे 35 कोटी मिळेनात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

सोलापूर : राज्य शासनाने सुरू केलेल्या हमीभाव केंद्रांवर शेतकऱ्यांनी 4400 रुपयांप्रमाणे हरभरा विकला. एक मार्चपासून अद्यापही शेतकऱ्यांना दमडाही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, खरिपाच्या मशागतीसाठी सावकाराचे दार ठोठावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

मागील गाळप हंगामात साखर कारखान्यांना ऊस घातला. परंतु, काही कारखान्यांकडून आणखी शेतकऱ्यांना एफआरपीदेखील मिळालेली नाही. त्यानंतर हरभरा हमीभावाने विक्री करण्याकरिता नोंदणी केली; परंतु मुदत संपल्याने तो हमीभावापेक्षा कमी किमतीने विकावा लागत आहे. तसेच, तुरीचेही पैसे काहींना मिळालेले नाहीत. अशी परिस्थिती असतानाच हरभऱ्याची तरी रक्‍कम लवकर मिळेल आणि खरीप हंगामाची मशागत करून बियाणे व खते घेऊ, असे नियोजन शेतकऱ्यांनी केले. मात्र, मागील साडेतीन महिन्यांपासून हरभऱ्याचा एक पैसाही मिळालेला नाही. सरकारकडूनच पैसे मिळत नाहीत, तर दाद कुणाकडे मागायची? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

हरभऱ्यासाठी पहिल्या टप्प्यात नाफेडकडून राज्यासाठी 119 कोटी रुपये मिळाले. परंतु, त्यात सोलापूर जिल्ह्याला एक रुपयाही मिळाला नाही. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून, रक्‍कम कधी मिळेल, हे निश्‍चित सांगता येणार नाही. 
- दिलीप पाटील, जिल्हा मार्केटिंग अधिकारी 
 
7,630 
नोंदणीकृत शेतकरी 

5,487 
हरभरा विकलेले शेतकरी 

79,715 क्‍विंटल 
विक्री केलेला हरभरा 

35.8 कोटी रुपये 
मिळणारी रक्‍कम 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minimum price rupees of 35 crores can't get