मंत्र्यांच्या ‘पीए’ना आमदारकीचे वेध!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

परंपरा जुनीच...
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पीए संदीप बेडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांचे पीए संजय सावकारे यांनी राजकारणात नशीब अजमावून पाहिले. यापैकी बेडसे मागील निवडणुकीत पराभूत झाले, तर सावकारे हे २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत निवडून आले. आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते.

मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांच्या स्वीय सहायकांची विधानसभेसाठी तयारी
मुंबई - मंत्री आस्थापनेवर पाच वर्षे काम केल्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना (पीए) आमदार होण्याचे वेध लागले आहेत. विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याही ‘पीए’चा समावेश आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अभिमन्यू पवार यांनी लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी केली आहे; मात्र पवार यांच्या उमेदवारीला लातूर जिल्ह्यातील भाजपचेच नेते संभाजी पाटील-निलंगेकर यांचा विरोध आहे. मुख्यमंत्र्यांनी निलंगेकर यांची समजूत काढल्यास पवार यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

याशिवाय, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनीही बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघातून नशीब अजमावण्याचे ठरवले आहे. परंतु, शेटे यांच्या उमेदवारीला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा विरोध आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची सावली म्हणून ओळखले जाणारे रामेश्‍वर नाईक जळगाव जिल्ह्यातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. पक्षाने सूचना केली, तर त्यांनी विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी ठेवली आहे. महाजन यांनी पाच वर्षांत जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात वैद्यकीय शिबिरे घेतली. त्यांच्या आयोजनात नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातील एक अधिकारीही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister PA MlA Vidhansabha Election Politics