
संदीप देशपांडेंना पळून जाणे भोवणार? गृहराज्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश
मुंबई : राज्यात भोंग्यांवरून वातावरण तापलं (Maharashtra Loudspeaker Controversy) असून आज मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी मुंबई पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलं. पण, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाले. यामध्ये एक महिला पोलिस अधिकारी देखील जखमी झाल्या आहेत. त्यामुळे आता संदीप देशपांडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गृहराज्य मंत्र्यांनी तसे संकेत देखील दिले आहेत.
हेही वाचा: संदीप देशपांडेंची पोलिसांच्या हातावर तुरी, 'शिवतीर्थ' समोरच चकवा
''मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज मुंबई पोलिस दलातील महिला अधिकारी यांच्यासोबत गैरवर्तन केले. याबाबतची गंभीर दखल घेतली असून घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिले आहेत,'' असं ट्विट गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी केलं आहे. त्यामुळे आता सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोपाखाली संदीप देशपांडेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच देशपांडेंना अटक देखील होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? -
मुंबई पोलिस मनसे पदाधिकाऱ्यांचा शोध घेत आहेत. पोलिस संदीप देशपांडेंच्या देखील मागावर होते. अखेर आज देशपांडे राज ठाकरेंच्या घरी त्यांच्या भेटीला आले. त्यानंतर त्यांनी 'शिवतीर्थ'बाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पोलिस त्यांना ताब्यात घेण्यासाठी वाट पाहत होते. पण, पोलिसांसोबत झटापट झाली. यामध्ये संदीप देशपांडे पळून जाण्यात यशस्वी झाले. पण, एक महिला पोलिस अधिकारी जखमी झाल्या आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलिस संदीप देशपांडे यांच्याविरोधात कठोर कारवाई कऱणार असल्याची माहिती मिळतेय.
Web Title: Minister Shambhuraje Desai Order Mumbai Police Action Against Mns Sandeep Deshpande
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..