अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार 

अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार 

नाशिक : जेवणातून गुंगीचे औषध देऊन 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या टोळीने तिची दिल्लीतील व्यक्तीला विक्री केली. त्यानंतर तिच्यावर गेली सहा वर्षे बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आठ संशयितांविरोधात मंगळवारी "पॉस्को' व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, पीडित मुलीची आई तक्रार देण्यासाठी आडगाव पोलिस ठाण्यात गेली असताना, तेथील पोलिस उपनिरीक्षकाने पिटाळून लावले. ही बाब अत्याचारविरोधी कृती समितीने पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2012 मधील घटनेत पीडित मुलीला संशयित नंदाने जेवणातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिला मंगला या महिलेकडे सोडले. तिने महिनाभर पीडित मुलीला एका खोलीत डांबून ठेवल्यानंतर पूजा या तिच्या मुलीकडे पाठविले. तेथून संगीता, राजू व संजय यांनी तिची दिल्लीतील एका व्यक्तीला विक्री केली. रतोडागाव (उत्तर प्रदेश) येथे संशयित संजय व त्याच्या घरातील पुरुषांनी तिच्यावर गेली सहा-साडेसहा वर्षे बलात्कार करीत अत्याचार केला. त्यामुळे पीडितेला चार व एक वर्षांची दोन मुले आहेत. 

या प्रकरणी पीडित काही दिवसांपूर्वी राखीपौर्णिमेचे निमित्त करून नाशिकला आल्यानंतर तिच्या आईने हकिगत ऐकून आडगाव पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी हाकलून लावले. तिने अत्याचारविरोधी कृती समितीकडे संपर्क साधला. समितीने पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची भेट घेतली. त्यानंतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

...अशी केली सुटका 
पीडित मुलीने दिल्लीत असताना राखीपौर्णिमेला घरी जाण्याचा हट्ट संशयित संजयकडे धरला होता. त्यानुसार तो काही दिवसांपूर्वी देवळाली कॅम्प येथील संशयित महिलेकडे तिला घेऊन आला. तेथून तिने आईला भेटण्याचा हट्ट धरला. मात्र, त्यास न जुमानता संशयित तिला पुन्हा रेल्वेतून दिल्लीला घेऊन जात असताना ती धावत्या रेल्वेतून उतरली. त्यामुळे संजयने तिला तिच्या घरी सोडले आणि पोबारा केला. 

"अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा प्रकार गुंतागुंतीचा आहे. तपासातून सत्य उजेडात आणले जाईल. तपास योग्य दिशेने सुरू असून, संशयितांनाही अटक केले जाईल.'' 
- सूरज बिजली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आडगाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com