सत्ताधाऱ्यांकडूनच समाजमाध्यमांचा गैरवापर : प्रशांत भूषण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

मुंबई : सत्ताधारी पक्षाकडून होत असलेला समाजमाध्यमांचा गैरवापर रोखण्यासाठी लोकशाहीवादी नागरिक व संघटनांनी दक्ष राहावे, असे आवाहन ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केले. त्यासाठी सरकारचे नियंत्रण नसलेली वेगळी यंत्रणा उभारायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

मुंबई : सत्ताधारी पक्षाकडून होत असलेला समाजमाध्यमांचा गैरवापर रोखण्यासाठी लोकशाहीवादी नागरिक व संघटनांनी दक्ष राहावे, असे आवाहन ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केले. त्यासाठी सरकारचे नियंत्रण नसलेली वेगळी यंत्रणा उभारायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

नेटिझन्स फॉर डेमोक्रॅसी या संस्थेने घेतलेल्या परिसंवादात ते बोलत होते. प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर सरकारचे वर्चस्व असले, तर आपण पर्यायी समाजमाध्यमांचा वापर करू शकतो; ते कमी खर्चाचे आणि परिणामकारक आहे असे भूषण म्हणाले. समाजात वैमनस्य पसरवण्यासाठी आणि जातीय दंगली घडवण्यासाठी समाजमाध्यमांचा गैरवापर होतो. त्याला रोखण्यासाठी आपण दक्ष राहिले पाहिजे. अशा बातम्या तपासून त्यांचा खोटेपणा उघड करायला हवा. या प्रकरणांत गुन्हा नोंदवून पाठपुरावा करण्यासाठी वेगळे पथक तयार करायला हवे, असे प्रतिपादन त्यांनी केले. 

प्रमुख प्रसारमाध्यमे लोकशाहीच्या रक्षणकर्त्याची भूमिका बजावत नसताना समाजमाध्यमांची भूमिकाच महत्त्वाची ठरेल. सत्ताधारी पक्षच समाजमाध्यमांचा गैरवापर करण्यात आघाडीवर आहे. फेसबुकने अनेक भाजपविरोधकांना ब्लॉक केले; पण भाजप समर्थकांना ब्लॉक केले नाही. साडेसातशे कोटींचा महसूल मिळणाऱ्या फेसबुकने मुंबईतील कार्यालयाच्या उद्‌घाटना वेळी सत्यनारायणाची पूजा केली, असे ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल यांनी सांगितले. 

"कारस्थाने उघड' 

समाजमाध्यमांचा अत्यंत चांगला वापर व आता गैरवापरही सत्ताधारी भाजपने केला, असे दिलीप मंडल व प्रशांत भूषण यांनी सांगितले. भाजपच्या आयटी सेलमध्ये 2000 व्यक्ती असून, त्यांना दरमहा प्रत्येकी 50 हजार रुपये पगार दिला जातो. खोट्या आणि वैमनस्य पसरवणाऱ्या बातम्या देणे, हेच त्यांचे काम आहे. आता ही कारस्थाने उघड झाली आहेत; हा गैरवापर कसा रोखावा यावर विचार व्हावा, असेही ते म्हणाले.

Web Title: Misuse of the media by the ruling party says Prashant Bhushan