भाजपकडून सत्तेचा गैरवापर - अजित पवार

भाजपकडून सत्तेचा गैरवापर - अजित पवार

माळेगाव - ‘‘पालघर व भंडारा-गोंदिया आदी निवडणूक भागात भाजपचे उमेदवार सुरवातीपासूनच धोक्‍यात होते. त्यामुळेच   ईव्हीएम मशिनचा बिघाड म्हणजे भाजपने केलेल्या सत्तेचा गैरवापर आहे,’’ असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तसेच, ‘‘मुख्यमंत्र्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरण्याची भाषा, ही लोकशाहीला घातक आहे,’’ असे मत व्यक्त केले.

बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने मेडद येथे गोदाम, पेट्रोल पंप, मंगल कार्यालय, वजन काटा आदी प्रकल्प नव्याने उभारणी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील गोदाम उभारणीच्या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र काटे देशमुख होते. या वेळी सभापती संजय भोसले, बाळासाहेब तावरे, पुरुषोत्तम जगताप, संजय जगताप, दत्तात्रेय आवाळे, संभाजी होळकर, सरपंच उज्ज्वला गावडे, माजी सरपंच अर्जुन यादव, सहायक निबंधक एस. एस. कुंभार, व्यवस्थापक नीलेश लोणकर आदी उपस्थित होते.

या वेळी अजित पवार यांनी सरकारने पाकिस्तानची आयात केलेली साखर, औरंगाबाद व कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली, भ्रष्टाचार केलेल्या २२ मंत्र्यांना पाठीशी घालणारे मुख्यमंत्री, हागणदारीमुक्त महाराष्ट्राची पोकळ घोषणा आदी मुद्द्यांवर भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘पवारसाहेब विशेषतः ऊस उत्पादकांच्या पाठीशी कायम राहिले. त्यांनी साखरेबरोबर इथेनॉलचे प्रतिलिटर दर वाढण्यासाठी वारंवार केंद्र सरकारशी बोलणी केली आहे. 

उसाचे हमीभाव देणारे नगदी पीक खरेतर शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे मिळवून देऊ शकते; परंतु सरकारच्या साखर आयात-निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे हा उद्योग साखर कारखानदारांच्या दृष्टीने खूपच अडचणीचा झाला आहे. वास्तविक देशात पुढील दीड वर्ष पुरेल एवढी साखर उपलब्ध असताना सरकारने पाकिस्तानची साखर आयात केली आणि देशांतर्गत साखर उद्योग उद्‌ध्वस्त केला. सरकारचा हा नालायकपणा शेतकऱ्यांसमोर येण्यासाठीच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पाकिस्तानी साखरेची गोदामे फोडली.’’    अनिल सावळे यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ धुमाळ यांनी आभार मानले. 

अग्रेसर सोसायट्यांना भेटवस्तू 
शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीस ५० वर्षे झाल्यानिमित्त बारामती खरेदी-विक्री संघाच्या वतीने सभासदांसह तालुक्‍यातील अग्रेसर विकास सोसायट्यांना अजित पवार यांच्या हस्ते भेट वस्तू वाटप केल्या. त्यामध्ये काटेवाडी, घाडगेवाडी, जळोची, देऊळगाव रसाळ, नायकोबा-लोणी भापकर, नीरावागज नंबर २, पिंपळी लिमटेक, प्रतिभा- माळेगाव, बाहुबली- पणदरे, लक्ष्मी- फोंडवाडा, शरद- शिरवली, काशीविश्‍वेश्‍वर- बारामती, श्रीराम- पिंपळी, माळेगाव खुर्द आदी सोसायट्यांचा समावेश होता.

एका बाजूला साखरेचे दर घसरले आहेत, तर दुसऱ्या बाजूला मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे न दिल्यास संचालक मंडळातील सदस्यांची मालमत्ता जप्त करा.’ मात्र, नितीन गडकरी, हरिभाऊ बागडे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांनी उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेत का, याची खातरजमा करावी आणि नंतर चंद्रकांतदादांनी बोलावे.
 - अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com