Vidhan Sabha 2019 : शिवसेनेला धक्का; तीनवेळा आमदार राहिलेला नेता करणार बंडखोरी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेसाठी सोडला जाणार नाही, अशी माहिती आहे. त्यामुळे रामटेकमधून तीन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल बंडखोरी करून अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. 

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेसाठी सोडला जाणार नाही, अशी माहिती आहे. त्यामुळे रामटेकमधून तीन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल बंडखोरी करून अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. 

2014 मध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते, त्या वेळी भाजपचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी त्यांचा पराभव केला होता. पराभूत झाल्यानंतरही जयस्वाल यांनी मतदारांशी संपर्क तोडलेला नाही आणि जनसंपर्क कायम ठेवत मतदारसंघाची बांधणी केली. सध्या ते महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आहेत. या संदर्भात विचारणा केली असता जयस्वाल म्हणाले, ""तीन वेळा आमदार झालो; पण कोणताही डाग स्वतःवर किंवा पक्षाला लागेल, अशी कृती केली नाही.

युतीमध्ये रामटेक शिवसेनेसाठी सुटेल, असा विश्‍वास आहे. अजूनही आशा सोडलेली नाही. पण, जर शिवसेनेला रामटेक मिळाला नाही, तर कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन जनतेच्या भावनांचा विचार करू. त्यानंतर येत्या 2 ऑक्‍टोबरला भूमिका स्पष्ट करून निर्णय जाहीर करू.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ashish Jaiswal may Contest independent In assembly election