आमदार बच्चू कडूंचा कृषी सचिवांना घेराव 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जानेवारी 2017

मुंबई - अमरावती विभागातील सूक्ष्म सिंचनाच्या प्रलंबित अनुदानावरून आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांसह कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव बिजय कुमार यांना आज मंत्रालयातील दालनात घेराव घातला. कृषी अधिकाऱ्यांच्या बदमाशीमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याचा आरोपही कडू यांनी केला. 

मुंबई - अमरावती विभागातील सूक्ष्म सिंचनाच्या प्रलंबित अनुदानावरून आमदार बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांसह कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव बिजय कुमार यांना आज मंत्रालयातील दालनात घेराव घातला. कृषी अधिकाऱ्यांच्या बदमाशीमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याचा आरोपही कडू यांनी केला. 

या वेळी आमदार कडू म्हणाले, अमरावती विभागातील शेतकऱ्यांचे सुमारे अडीचशे कोटी रुपये ठिबक अनुदान प्रलंबित आहे. राज्य सरकारने हे अनुदान मंजूर केले आहे. तरी अद्यापही स्थानिक अधिकारी शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करीत नाहीत. शेतकऱ्यांनी ठिबक संचासाठी हजारो रुपये खर्च केले आहेत. शेतकऱ्यांकडून बॅंकांची व्याज वसुलीही सुरू झाली आहे. मुख्यमंत्री, वित्तमंत्री, कृषिमंत्री देखील विदर्भातील असूनही कृषी अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. 

अधिकाऱ्यांच्या मनमानीचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. अधिकाऱ्यांना पैसे दिले नाहीत म्हणून शेतकऱ्यांना अनुदान दिले जात नाही, असा आरोपही कडू यांनी केला. अधिकाऱ्यांची बदमाशी आणि सरकारची नामुश्‍की यामुळे शेतकरी अडचणीत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. या सगळ्यांविरोधात कडू यांनी कार्यकर्त्यांसह मंत्रालयातील कृषी सचिवांच्या दालनात ठिय्या मांडला. याबाबी त्यांनी अप्पर मुख्य सचिव बिजय कुमार यांच्याही निदर्शनास आणून दिल्या. तसेच ठोस निर्णय आणि भूमिका घेतली जात नाही, तोवर दालन सोडणार नाही, असा पवित्रा घेतला. या वेळी आमदार समर्थक कार्यकर्ते जोरजोरात घोषणाबाजीही करीत होते. त्यामुळे पाचव्या मजल्यावरील दालनाबाहेर काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. 

संबंधित शेतकऱ्यांनी कृषी खात्याची परवानगी न घेताच ठिबक संच बसवले आहेत. त्यामुळे त्यांना अनुदान मिळालेले नाही. विदर्भ सधन सिंचन ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना होती. ती आता सरकारने बंद केली आहे. या योजनेंतर्गत मंजूर निधीच्या मागणीसाठी केंद्राला विनंती करणार आहे. हे पैसे मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल. 
- पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री 

Web Title: mla bacchu kadu enclosures agriculture secretary