
लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे महत्त्वाचे स्तंभ असतात. सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करायची असते.
Balasaheb Patil : पडळकर, दरेकर, खोतांची लोकप्रियतेसाठीच शरद पवारांवर टीका; आमदार पाटलांचा घणाघात
कऱ्हाड : सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे सरकारमध्ये आमदार, मंत्री होते. आजही ते सत्तेतील पक्षात आहेत. त्यामुळे त्यांनी राज्य शासनाकडे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजेत. भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत हे लोकप्रियता मिळावी, यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत असल्याचे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
रयत क्रांती संघटनेने काढलेल्या शेतकऱ्यांच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे महत्त्वाचे स्तंभ असतात. सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करायची असते. विरोधी मंडळींनी जनआंदोलन, रस्त्यावर येणे आणि पदयात्रा काढणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे खोत हे सरकारमध्ये आमदार, मंत्री होते. आजही ते सत्तेतील पक्षात आहेत. त्यामुळे त्यांनी राज्य शासनाकडे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजेत.’
आमदार पाटील (Balasaheb Patil) म्हणाले, ‘पडळकर (Gopichand Padalkar), दरेकर, खोत हे लोकप्रियता मिळावी, यासाठी शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. केंद्र व राज्यातील यंत्रणांचा वापर राजकीयदृष्ट्या केला जात आहे. ज्यांच्यावर पूर्वी आरोप झाले ते आता भाजपमध्ये गेले. शिंदे गटात गेले, त्यांची चौकशी होत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात विरोधकांना अडचणीत आणण्याचे काम सरकारकडून सुरू आहे.’
मंत्रिपद मिळण्याबाबत साशंकता
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या आमदारांना अपेक्षा आहे. शिवसेनेतून शिंदे गटात मंत्रिपदासाठी अनेकजण गेलेले आहेत, असे सांगून आमदार पाटील म्हणाले, ‘मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वी मला मंत्रिपद मिळणार, पालकमंत्रिपद मिळणार, असे यापूर्वी कोणताही आमदार म्हणत नव्हता. त्यामुळे जे आमदार नाहीत, त्यांना मंत्रिपद मिळण्याबाबत साशंकता आहे,’ असे मत त्यांनी खोत यांच्या मंत्रिपदाबाबतच्या प्रश्नावर व्यक्त केले.