काही आमदार लवकरच भाजपमध्ये - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचा आपल्या कर्तृत्वावरचा विश्‍वास उडाला आहे, त्यामुळेच त्यांचे संघटन भरकटत चालले आहे. जर नेतृत्वच आत्मविश्‍वास गमावून बसले असेल, तर नेते आणि सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचे? 
- चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

सोलापूर - कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान आमदार भाजप, शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत अनेक इच्छुक आमदार राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केला. पण ते आमदार कोण हे विचारता, ते गुपित आहे, गुपितच राहू द्या, असे ते म्हणाले. 

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मंत्री पाटील हे पहिल्यांदाच सोलापूरच्या दौऱ्यावर आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालात म्हणजे मुख्यमंत्रिपदावरचा दावा संपला का? असा प्रश्न विचारता तेव्हा ते म्हणाले, काम करत राहायचे, पदे अनपेक्षितपणे मिळतात. आज प्रदेशाध्यक्ष झालो, पाच वर्षापूर्वी मंत्री झालो, तेव्हा मला काहीच माहीत नव्हते. मुख्यमंत्रिपदावर मी कधीही दावा केला नाही. 

आगामी निवडणुकीत युतीचा २२० जागांवर विजय होईल, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. विधानसभेनंतर मुख्यमंत्री कोणाचा? या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले मुख्यमंत्रिपदाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या तिघांचे काय ठरले आहे हे या तिघांनाच माहीत असून, आपल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी शिवसेना आणि भाजप या पदावर दावा करत आहेत. त्यात चुकीचे काही नाही, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Entry in BJP Chandrakant Patil Politics