आमदार परिचारकांच्या बेताल वक्तव्याने संताप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

पंढरपूर/भोसे - देशासाठी संपूर्ण घरादाराचा त्याग करणाऱ्या व सीमेवर डोळ्यांत तेल घालून संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पत्नीच्या चारित्र्यावरच पंढरपूर येथील भाजपपुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी शिंतोडे उडविल्याने संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष निर्माण झाला आहे. भोसे (ता. पंढरपूर) येथील प्रचारसभेतील या हीन पातळीवरील बेताल वक्तव्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच सोशल मीडियातून या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. 

भोसे (ता. पंढरपूर) येथे शुक्रवारी सायंकाळी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना आमदार परिचारक यांनी राजकारण सध्या कशा पद्धतीने चालू आहे, याचे उदाहरण सांगताना हे वक्तव्य केले. ते म्हणाले, की मी आणि आमदार बबनराव शिंदे यांनी उजनीच्या पाण्याचे नियोजन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा करू ठरवले होते. त्याचे श्रेय मात्र आमदार भारत भालके घेत असून, या विषयावर बोलताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी पंजाब येथील सैनिक वर्षभर सीमेवर असतो, एकदाही घराकडे येत नाही तरीही त्याला मुलगा होतो आणि तो सीमेवर पेढे वाटून आनंद साजरा करतो, अशा प्रकारची भारतीय जवानांच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणारी अशोभनीय टिप्पणी केली. 

परिचारकांची जाहीर दिलगिरी 
दरम्यान, परिचारक यांना त्यांच्या बेताल वक्तव्याची जाणीव झाली. त्यांनी आज सकाळी त्यांच्या वक्तव्याविषयी पत्रकारांच्या समोर जाहीर माफी मागितली. ते म्हणाले, ""गेली अनेक वर्षे समाज आमच्या कुटुंबाला ओळखतो. देशाच्या सीमेवीर देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याची भूमिका आम्ही आजवर घेतलेली आहे. तथापि भाषणाच्या ओघात अनवधानाने आपल्याकडून चुकीचे वक्तव्य केले गेले. माझ्याकडून झालेल्या वक्तव्यासंदर्भात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो.'' 

सोशल मीडियात संताप 
आमदार परिचारक यांच्या त्या बेताल वक्तव्याची ऑडिओ व व्हिडिओ क्‍लिप सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होताच सर्वत्र संतापाची लाट पसरली. काही ठिकाणी आमदार परिचारिकांचे पुतळे जाळण्यात आले, तर काही ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला चपलांचे हार घालून निषेध व्यक्त केला.

Web Title: MLA Paricharak statement