आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, बटणावरील मतदानानेच सगळे बिघडले, आता शिक्का हवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 praniti-shinde.jpg
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, बटणावरील मतदानानेच सगळे बिघडले, आता शिक्का हवा

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, बटणावरील मतदानाने सगळे बिघडले, आता शिक्काच हवा

सोलापूर : देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक सरकारी उद्योग, कंपन्या बंद पडल्या. बेरोजगारीत वाढ झाली, महागाई वाढली, गोरगरिबांच्या हाताला काम नाही, हातावरील पोट उपाशीच आहेत. त्यामुळे जनता ही मालक असून त्यांनी काम करणाऱ्यांनाच संधी द्यायला हवी, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये मतदानासाठी शिक्काच असायला हवा, बटणानेच सगळे बिघडविल्याचा आरोप त्यांनी केला.

शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील बापूजीनगर येथे युवक काँग्रेसची शाखा सुरू झाली. त्याच्या नामफलकाच्या उद्‌घाटनप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे, नवीन शाखेचे अध्यक्ष गणेश म्हेत्रे, कुर्मेश बुगले, नीलम माने, परशुराम बुगले, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव, रफिक चकोले, अशोक सायबोलू, दाऊद नदाफ, दीपक फुले, तिरुपती परकीपंडला, विवेक कन्ना, श्रीकांत वाडेकर, चौबल मनसावाले, अशोक सायबोलू, सिद्राम टायगर, संजय गायकवाड, राजेंद्र शिरकुल, सुनील सारंगी, यासीन शेख, शब्बीर फुलमामडी, सुभाष वाघमारे, सलमान शेख, अमीर तांबोळी, चंद्रकांत नाईक, अल्पना अभंग आदी उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाल्या, आता कोणतीही निवडणूक नाही, तरीसुद्धा मी तुम्हाला साद घालायला आली आहे. आम्ही कामांवर बोलतो, असे सांगत आगामी निवडणुकीत ‘ताई, माई, अक्का, विचार करा पक्का अन्‌ हातावर मारा शिक्का’ असे म्हणताना त्यांनी निवडणुकीत शिक्काच असायला हवा, बटणाने तर सगळे बिघडवून टाकल्याचीही टीका केली.

तुम्ही साथ द्या, आम्ही दररोज पाणी देऊ

बापूजीनगर भागातील नागरिकांनी मला भरभरून मते देऊन तिसऱ्यांदा निवडून दिले, हे मी कधीच विसरू शकत नाही. बापूजी नगरातील सर्व जनतेचे मी कायम ऋणी राहीन. जनता ही मालक असून त्यांनी अशीच साथ यापुढेही आम्हाला द्यावी. उजनी मायनसमध्ये असताना आणि दुष्काळ असतानाही काँग्रेसने सोलापूरकरांना एक दिवसाआड पाणी दिले. पण, आता उजनी धरण प्लसमध्ये असूनही शहराला पाच दिवसांआड पाणी मिळत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सुद्धा तुम्ही काँग्रेसला साथ द्या, आम्ही नियमित पाणी देऊ, अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली.

Web Title: Mla Praniti Shinde Said Voting On The Button Only Spoiled Everything Now We Need A

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..