
Satyajeet Tambe : सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून नाशिकमधील पाच जिल्ह्यांमध्ये सुरू होणार ‘युवा माहिती केंद्र’
आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात विविध मुद्दे उपस्थित करून छाप पाडणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आमदार तांबे यांच्या प्रयत्नांतून नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये युवा माहिती केंद्रांची स्थापना होणार आहे. राज्य सरकारने निधी तातडीने मंजूर करावा यासाठी तांबे यांनी पुढाकार घेतला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाना यश मिळाले आहे.
या माहिती केंद्रांमध्ये तरुणांच्या आयुष्यातील विविध समस्यांवर तोडगा काढला जाईल. राज्यात तरुणांच्या विकासाला वाहिलेला एकही विभाग नाही, ही बाब आमदार सत्यजीत तांबे यांनी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत भाषण करताना अधोरेखित केली होती.
राज्यात क्रीडा व युवक कल्याण विभाग असला, तरी तरुणांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा कोणताही कार्यक्रम नाही. त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केलं होतं. त्याच बरोबर त्यांचा मतदारसंघ असलेल्या नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये युवा माहिती केंद्र सुरू करण्यासाठी निधीची मागणीही केली होती.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये युवा माहिती केंद्रे उभारण्यासाठी प्रत्येकी एक कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नाशिक व अहमदनगरमध्ये देखील अशाचप्रकारची केंद्र उभारण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे निवडणुकीदरम्यान अशा युवा माहिती केंद्रांची उभारणी करण्याचं तांबे यांनी आपल्या जाहीरनाम्यात नमूद केलं होतं.
या माहिती केंद्रांमध्ये नोकरी, शिक्षण, उच्च शिक्षण आदी गोष्टींबाबत तरुणांना असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची तरतूद असेल. जगभरातील नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या संधी, त्यासाठी आवश्यक पात्रता, राज्य व केंद्र सरकार यांच्याकडून दिली जाणारी मदत, अशा अनेक बाबींची माहिती या केंद्रात घेणं शक्य होईल. तरुणांना ज्या क्षेत्रात रस आहे, अशा क्षेत्रांची आणि त्यातील संधींची माहितीही या केंद्राद्वारे त्यांना मिळेल. या केंद्रात को-वर्किंग स्पेस, वाचनालय अशा सुविधाही पुरवल्या जातील.
महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. या तरुणांना मदत होईल किंवा त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष पुरवलं जाईल, असा एकही विभाग सध्या राज्यात नाही. युवा माहिती केंद्रासारखा उपक्रम ही पोकळी भरून काढेल, असा विश्वास आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला. तसंच धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांमधील युवा केंद्रांसाठीचा निधी मंजूर झाला असून नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांसाठीही लवकरच निधी प्राप्त होईल, असंही आमदार तांबे यांनी स्पष्ट केलं.
आपल्या पहिल्याच टर्मच्या पहिल्याच काही महिन्यांमध्ये आमदार सत्यजीत तांबे राज्य सरकारकडून निधी मंजूर करून घेण्यात यशस्वी झाले. त्याच बरोबर आपल्या मतदारसंघात महत्त्वाची केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीनेही त्यांनी ठोस पावलं उचलली आहेत.
आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यासाठी ९५ लाख रुपये मंजूर झाले असून त्यापैकी ७५ लाख रुपये वाचनालयासाठी आणि २० लाख रुपये वाचनालयाच्या डिजिटायझेशनसाठी दिले गेले आहेत.
त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात कुसुमाग्रज मराठी भाषा अभ्यास केंद्रासाठी ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. तसंच जिल्ह्यात आदर्श शाळा उभारण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद झाली आहे. शिवाय, मालेगावमधील उर्दू शाळांसाठीदेखील ५० लाखांचा निधी मंजूर झालेला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रासाठी राज्य सरकारने ५५ लाख रुपये देऊ केले आहेत. त्याशिवाय नाशिक, अहमदनगर आणि नंदुरबार जिल्ह्यांतील विविध कामांसाठीही निधी मंजूर झाला असून त्यामुळे अनेक कामांना चालना मिळेल, असा विश्वास आ. तांबे यांनी व्यक्त केला.