प्रशांत परिचारक दीड वर्षांसाठी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सैनिकांच्या पत्नींच्या चारित्र्याविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद अधिवेशनात उमटत होते.

मुंबई - सैनिक व त्यांच्या पत्नींविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांना आज (गुरुवार) दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या वक्तव्याच्या चौकशीसाठी दहा जणांची समिती नेमण्यात आली आहे. 

परिचारक यांना निलंबित करत असल्याची घोषणा आज सरकारकडून करण्यात आली. विधान परिषदेत सभागृह नेता चंद्रकांत पाटील यांनी बुधवारीच त्यांच्या निलंबनाबाबत वक्तव्य केले होते. विरोधकांनी परिचारकांच्या तातडीच्या निलंबनाची मागणी लावून धरल्याने सलग तिसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले होते.
 
आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सैनिकांच्या पत्नींच्या चारित्र्याविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद अधिवेशनात उमटत होते. अखेर सरकारने परिचारक यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. 

देशातील सैनिकांच्या पत्नींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार प्रशांत परिचारक यांना सभागृहातून बडतर्फ न करता केवळ निलंबनाची कारवाई करून सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी केला होता. सरकारला परिचारकांना वाचवायचे आहे, आम्ही हे होऊ देणार नाही, परिचारकांना बडतर्फ करावेच लागेल, अशी ठाम भूमिका विरोधी पक्षनेते मुंडे यांनी घेतली होती.

Web Title: MLC prashant paricharak suspended for derogatory remarks on army wives