
Satyajeet Tambe : पहिल्याच अधिवेशनात सत्यजीत तांबे मांडणार 'हे' मुद्दे; म्हणाले...
मुंबईः आजपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. येत्या २५ मार्चपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार असून काल शिवसेनेच्या सर्व आमदारांना प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिप बजावल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून नव्यानेच निवडून आलेले सत्यजीत तांबे हे पहिल्या अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अधिवेशनामध्ये उपस्थित करणाऱ्या मुद्द्यांविषयी भाष्य केलं.
सत्यजीत तांबे म्हणाले की, अधिवेशनामध्ये सुशिक्षित बेरोजगार आणि सामान्यांचे प्रश्न प्रकर्षाने मांडणार आहे. हे पहिलं अधिवेशन असल्याने शाळेतला पहिला दिवस जसा असतो तशा भावना निर्माण झाल्या आहेत.
तांबे पुढे म्हणाले की, मी युवकांचा आवाज बनून सभागृहात काम करणार असून त्याबाबत माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा आणि उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा मुद्दा सभागृहात मांडणार असल्याचं सत्यजीत तांबे म्हणाले.
भास्कर जाधवांचा सरकारवर निशाणा
शेड्यूल १० या पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्याचं सरकारला भान आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कै. अटलबिहारी वाजपेयी यांनी हा कायदा आणला होता. बंडखोरांनी एखाद्या पक्षात सामील व्हावं किंवा नवीन पक्ष स्थापन करावा. व्हिपने कुणी घाबरवत असेल तर मी भीक घालत नाही. आमचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमचं संरक्षण काढलं तरी आम्ही डगमगलो नाही तर व्हिपचं काय घेऊन बसलात, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.