esakal | सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर राज ठाकरेंचा मोठा खुलासा; सांगितली पक्षाची भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

sushant singh rajput and raj thackaray

सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर नेपोटिझम शब्द ट्रेंड होत होता. चाहत्यांनी आरोप केला आहे की, इंडस्ट्रीमध्ये घराणेशाही इतकी आहे की सुशांतसारख्या प्रतिभावान लोकांचा यामुळे गळा घोटला जातोय. याशिवाय सुशांत सिंग राजपूतवर कोणाचा दबाव होता याबद्दलही उलट सुलट चर्चा होत आहे. 

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर राज ठाकरेंचा मोठा खुलासा; सांगितली पक्षाची भूमिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीत घराणेशाहीवरून आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली. सुशांतच्या आत्महत्येमागे इंडस्ट्रीतील ही घराणेशाही असल्याचा थेट आरोप काही कलाकारांनी केला. काही बॉलिवूड कलाकारांनी घराणेशाहीवर टीका करताना त्यांचा अनुभवही शेअर केला आहे. अशा परिस्थितीत घराणेशाहीचा सामना करावा लागत असलेल्या कलाकारांनी आम्हाला कळवा असं मनसेनं म्हटल्याचं वृत्त काही माध्यमातून प्रसिद्ध झालं. मनसेच्या नेत्याकडून असं सांगण्यात आल्याचंही बातम्यांमध्ये म्हटलं होतं. विगेश सरस्वत यांनी आवाहन करत कलाकारांनी त्यांच्या अडचणी सांगाव्यात आम्ही त्या सोडवण्यासाठी मदत करू असं म्हटल्याचा दावा या वृत्तांमधून करण्यात आला होता. 

सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगल्यानंतर अनेकांनी मनसेच्या या भूमिकेचं कौतुकही केलं. दरम्यान, दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेची अशी कोणतीही भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी फेसबुक पेजवरून अधिकृतपणे याबाबत भूमिका मांडली आहे. 

सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत वाद उसळला आहे आणि माध्यमातील घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला गेला. ह्या वादाच्या अनुषंगाने यापुढे कलाकारांवर अन्याय झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशा आशयाच्या बातम्या काही ठिकाणी प्रसारित झाल्या. 
मी हे इथे स्पष्ट करू इच्छितो की या वादाच्या आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी धन्यवाद. 
-राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

हे वाचा - सुशांतला वाईट अभिनेता म्हणणा-या केआरकेची दिग्दर्शक मिलाप जवेरी यांनी केली पोलखोल

सुशांतसिंग राजपूतने 14 जूनला आत्महत्या केली होती. त्यानंतर आतापर्यंत याप्रकरणी अनेकांची चौकशी कऱण्यात आली. सुशांत सिंग राजपूत नैराश्याने त्रस्त होता. त्यातूनच सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर नेपोटिझम शब्द ट्रेंड होत होता. चाहत्यांनी आरोप केला आहे की, इंडस्ट्रीमध्ये घराणेशाही इतकी आहे की सुशांतसारख्या प्रतिभावान लोकांचा यामुळे गळा घोटला जातोय. याशिवाय सुशांत सिंग राजपूतवर कोणाचा दबाव होता याबद्दलही उलट सुलट चर्चा होत आहे. सुशांतची ही आत्महत्या नसून तो खून असल्याचंही नेटिझन्सनी म्हटलं आहे. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.