मनसे विधानसभेत स्वबळावर लढणार

mns
mns

मुंबई  : "लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात रान उठवले होते. आता मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. या पार्श्‍वभूमीवर पक्षबांधणीसाठी राज ठाकरे रविवारपासून (ता. 2) तीन दिवस पुण्यात बैठका घेणार आहेत. 

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही जोरदार तोफमारा करून शिवसेना- भाजपची झोप उडवण्याचा निर्धार केला आहे. ते शिवसेनेलाही धारेवर घेणार असून, उद्धव ठाकरे यांची पाच वर्षांतील दुटप्पी भूमिका मतदारांसमोर व्हिडिओतून मांडणार असल्याचे समजते. संपूर्ण राज्यात मनसेची पुनर्बांधणी करण्याच्या हेतूने ते प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. या मोहिमेची सुरवात रविवारपासून (ता. 2) पुण्यातून होईल. राज ठाकरे पुण्यात तीन दिवस तळ ठोकून पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेणार आहेत. त्यानंतर ते नाशिक, ठाणे आणि मुंबईत बैठका घेतील. 

"जगनमोहन पॅटर्न' 
आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेसने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवून घवघवीत यश मिळवले. हाच "जगनमोहन पॅटर्न' महाराष्ट्रात अवलंबण्याची मनसेची मानसिकता आहे. मनसे विधानसभेच्या नेमक्‍या किती जागा लढणार हे निश्‍चित झाले नसले, तरी राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात दौरे काढून वातावरणनिर्मिती करणार असल्याचे एका नेत्याने सांगितले. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हेच मनसेचे प्रमुख "टार्गेट' असेल. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीशी मैत्रीपूर्ण लढत होईल असे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com