'ईडी' नोटीस प्रकरणी मनसेने बोलावली उद्या तातडीची बैठक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना 'ईडी'ने कोहिनूर मिल व्यवहाराप्रकरणी नोटीस बजावली आहे.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी) विभागाने नोटीस बजावली आहे. या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असून यासंदर्भात उद्या (मंगळवार) मुंबईत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीला मनसेचे नेते, सरचिटणीस आणि विभाग प्रमुख उपस्थित राहणार असून मनसेच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना 'ईडी'ने कोहिनूर मिल व्यवहाराप्रकरणी नोटीस बजावली आहे. राज ठाकरे यांना 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी 'ईडी' कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. कोहिनूर मिल व्यवहारात राज ठाकरे यांचा ही सहभाग असल्याने त्यांच्या चौकशीची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. मात्र, आता राज ठाकरे यांना नोटीस आल्याने मनसैनिक आक्रमक झाले आहेत.

मनसेने याविरोधात आक्रमक भूमिका घ्यायचा निर्णय घेतला आहे. येत्या 22 ऑगस्टला ठाणे आणि पालघरमध्ये बंद पुकारल्यानंतर मुंबई आणि राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत देखील आक्रमक आंदोलन होण्याची शक्यता आहे. याची रणनीती ठरवण्यासाठी मंगळवारी 'राजगड' या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात ही बैठक संपन्न होणार असून या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस, विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS convenes emergency meeting on ED notice issue tomorrow