
Raj Thackeray : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. भाजप, शिवसेना(शिंदे, ठाकरे गट), राष्ट्रवादी(दोन्ही गट) यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसेने) लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे. लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. मनसे यंदाची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवेल असे म्हटले जात आहे.
मात्र मनसेवर नेहमीच आपल्या भूमिका बदलण्याचा आरोप होतो. टोलचा विषय असू दे, की नरेंद्र मोदी यांना आधी पाठिंबा मग विरोध असू दे, की मराठी माणसावरून थेट हिंदुत्वाचा विषय असू दे. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसे वेळोवेळी आपल्या भूमिका बदलतात असे म्हटले जाते. यात अजून एका भूमिकेची भर पडली असल्याचे समोर येत आहे.
2014 साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर घोषणा केली होती की, मनसे यापुढे कधीही लोकसभा निवडणूक लढवणार नाही. त्यावेळी राज ठाकरेंनी भूमिका मांडली होती की, राष्ट्रीय पक्षाने विधानसभेच्या निवडणुका लढवू नयेत आणि प्रादेशिक पक्षांनी लोकसभा लढून नयेत. त्यानंतर 2019 साली मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती.
मात्र यंदा राज ठाकरे यांच्या त्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा बदल होत असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी आता पुन्हा एकदा पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे करण्याचे ठरवले असल्याचे म्हटले जात आहे.
2014 च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या कित्येक लोकसभेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. 2009 साली मनसेला भरभरून मत मिळाली होती. यंदा म्हणजेच 2024 साली आता नक्की मनसे लोकसभा निवडणूक लढणार का ? आणि त्यानंतर मनसेला मतदारराजा साथ देणार का? हे पाहणं अतिशय उत्सुकतेच ठरणार आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात असून, यावेळी ते पुन्हा या जागेवरून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी, भाजप असे इतर पक्षही लक्ष ठेवून आहेत.