
Raj Thackeray : मनसेच्या सभेचा ट्रेलर रिलीज; 'हे फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर राजकारणासाठी...'
मुंबईः राज ठाकरेंच्या गुढीपाडवा सभेची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यात जो सत्तासंघर्ष झाला, त्यावर राज ठाकरे बोललेले नाहीत. त्यामुळे २२ तारखेला राज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन राज ठाकरेंच्या सभेचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 'महाराष्ट्राच्या मनातील खदखद व्यक्त करणाऱ्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी... चला शिवतीर्थावर' असं कॅप्शन व्हीडिओला देण्यात आलंय.
एकनाथ शिंदे यांनी बंड करुन राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर हक्क सांगितला. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केलं आहे. शिवाय सध्या खालच्या पातळीवर जावून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. या सर्व मुद्द्यांवर राज ठाकरे बोलतील, अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरुन रान पेटवलं होतं. तो मुद्दा ते पुन्हा उपस्थित करणार आहेत. मनसेच्या वर्धापन दिन सभेत त्यांनी त्याबाबत ओझरती कल्पना दिली होती. यासह केंद्रातील भाजप सरकार आणि निवडणुका... या सगळ्या मुद्द्यांवर राज ठाकरे काय बोलणार? हे पाहावं लागणार आहे.
'महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणाला नवनिर्माणाची गरज आहे' असं ट्रेलरमध्ये सांगण्यात आलेलं आहे. मागील दोन-अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रात जे राजकारण सुरुय ती महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही, असं महाराष्ट्रात कधीही नव्हतं... असं राज ठाकरे ट्रेलमध्ये सांगत आहेत.