
Maharashtra Politics: राजकारण तापणार? पवार-शिंदे नंतर अदानी-पवार भेट! मनसेची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Politics: महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (1 जून) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील वर्षा बंगल्यावर भेट घेतली. मराठा मंदिर संस्थेला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. हा कार्यक्रम 24 जून रोजी मुंबईत होणार आहे. शरद पवार हे मराठा मंदिर संस्थेचे अध्यक्ष आहेत.
या बैठकीनंतर शरद पवार यांनी मराठा मंदिराच्या अमृत महोत्सवाच्या वर्धापनदिनानिमित्त संस्था एका कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे ट्विट केले. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मात्र ही भेट पूर्ण ४० मिनिट चालली. दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा फक्त कारण निमंत्रणाचे नसेल, अशी चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर गौतम अदानी हे सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले. त्यामुळे महाराष्ट्रात मोठी घडामोड घडण्याची चिन्हे दिसत आहेत. यानंतर रात्री उशिरा भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
यावर मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले की काहीना पोटदुखी होते. मात्र पवार साहेब मुख्यमंत्री यांना भेटले की सगळ्यांची हाताची घडी आणि तोंडावर बोट. गौतम अदानी राज ठाकरे यांना भेटले की प्रश्न मात्र अदानी शरद पवार यांना भेटले की सगळे चिडीचूप," असे गजानन काळे म्हणाले.