'मोदींच्या मागे महाराष्ट्राचे पैसे खाल्लेले दोन मंत्री बसलेले'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 जानेवारी 2019

- आमचा लढा केंद्रात-राज्यात बसलेल्या हुकूमशाह विरोधात आहे
- रायगडला सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाची गरज
- यावर्षी जर निवडणूका नसत्या तर पेट्रोलने शंभरी पार केली असती
- साडेचार वर्षात या सरकारने पदोपदी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला

रायगड- पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सोलापुरात आले होते. ते म्हणाले की, चौकीदार देशाचे संरक्षण करेल. मोदी यांच्या मागेच दोन मंत्री बसले होते ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे पैसे खाल्ले. मोदीजी, कहा है चौकीदार? की चौकीदारही चोर है? असा प्रश्न विधानपरिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

मुंडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल मंत्री असताना भेल सारखा प्रोजेक्ट आणला. आज कोकणात एकही प्रकल्प आलेला नाही. इथला खासदार जो केंद्रात मंत्रीही आहे त्याला एकतरी रोजगार आणता आला का? असा प्रश्न उपस्थित करताना रायगडला सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. आज सत्ताधारी विकासाच्या नावावर मतं मागत नाही. भाजपने शिवसेनेची धार घालवली. युती गेली खड्ड्यात असं उद्धव ठाकरे स्वत:च एका भाषणात म्हणाले. खरयं, महाराष्ट्राची जनता आता युतीला खड्ड्यात टाकल्याशिवाय राहणार नसल्याचेही मुंडे म्हणाले.

 

देशाचा विकास करण्याची भाषा युती सरकारने केली होती. यावर बोलताना मुंडे म्हणाले की, कोकणचा विकास झाला आहे का? यावर्षी जर निवडणूका नसत्या तर पेट्रोलने शंभरी पार केली असती. चारशे रुपयांचा सिलेंडर आज हजारला विकला जात आहे. ही लूट आहे. यांनी देशाला-राज्याला सत्ताधाऱ्यांनी बरबटून खाल्लं आहे. 'हा संघर्ष सामान्य माणसांच्या हक्कासाठी आहे', चवदार तळ्यालगत लिहलेली ही ओळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महती सांगते. मात्र देशाची घटना लिहीणाऱ्या डॉ. आंबेडकरांचाही आज अपमान केला जात आहे. या सरकारच्या काळात लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली घटना जाळण्याची हिम्मत होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

शिवस्मारकाची घोषणा करून एक वीटही रचली गेली नाही. शिवाजी महाराज यांच्या नावे कर्जमाफी जाहीर केली मात्र शेतकऱ्यांना मदत काही मिळाली नाही. साडेचार वर्षात या सरकारने पदोपदी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले. पुढे ते म्हणाले की, परिवर्तन आणि रायगडाचं एक अनोखं नातं आहे. म्हणूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसने निर्धार परिवर्तनाची लढाई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या राजधानीतून सुरु केली. आमचा लढा केंद्रात-राज्यात बसलेल्या हुकूमशाह विरोधात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Modi Is Chaukidar Aur Chor Ask Dhananjay Munde In His Speech