मोदी सरकारचा जाहिरातींवर 4 हजार 343 कोटींचा खर्च

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारने गेल्या 46 महिन्यांत सर्व प्रकारच्या जाहिरातींवर एकूण 4 हजार 343 कोटी 26 लाख रुपये खर्च केले असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारने गेल्या 46 महिन्यांत सर्व प्रकारच्या जाहिरातींवर एकूण 4 हजार 343 कोटी 26 लाख रुपये खर्च केले असल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळाली. जाहिरातींवरील खर्चाबाबत चोहोबाजूंनी टीकेनंतर यावर्षी खर्चात 25 टक्‍क्‍यांची कपात करत मोदी सरकारने गतवर्षाच्या तुलनेत 308 कोटी रुपये कमी खर्च केले.

केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ आउटरिच एंड कम्युनिकेशन खात्याचे वित्तीय सल्लागार तपन सूत्रधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जून 2014 पासून 31 मार्च 2015 या कालावधीत 424.85 कोटी प्रिंट मीडिया, 448.97 कोटी इलेक्‍ट्रॉनिक मीडिया आणि 79.72 कोटी बाह्य प्रचारावर खर्च केले आहे. वर्ष 2015 -2016 या आर्थिक वर्षात 510.69 कोटी प्रिंट मीडिया, 541.99 कोटी इलेक्‍ट्रॉनिक मीडिया आणि 118.43 कोटी बाह्य प्रचारावर खर्च केले आहे. वर्ष 2016-2017 या आर्थिक वर्षात 464.39 कोटी प्रिंट मीडिया, 613.78 कोटी इलेक्‍ट्रॉनिक मीडिया आणि 185.99 कोटी बाह्य प्रचारावर खर्च केले आहे. 1 एप्रिल 2017 पासून 7 डिसेंबर 2018 कालावधीत 333.23 कोटी प्रिंट मीडियावर खर्च केले. 1 एप्रिल 2017पासून 31 मार्च 2018 या कालावधीत इलेक्‍ट्रॉनिक मीडियावर 475.13 कोटी खर्च केले आणि बाह्य प्रचारात 147.10 कोटी हे 1 एप्रिल 2017 पासून 31 जानेवारी 2018 पर्यंत खर्च करण्यात आले आहे.

2017-18 या आर्थिक वर्षात खर्चात कपात केली असल्याची बाब समोर आली आहे. वर्ष 2016-17 आर्थिक वर्षात एकूण 1263.15 कोटी खर्च करणाऱ्या सरकारने वर्ष 2017-2018 या आर्थिक वर्षात 955.46 कोटी खर्च केले आहे. 308 कोटी कमी खर्च करत जवळपास 25 टक्‍क्‍यांची कपात केली गेली आहे.

Web Title: modi government advertise 4343 crore expenditure