मस्तवाल राज्यकर्त्यांचा 'मानसिक घोटाळा'- शिवसेनचे टीकास्त्र

टीम ई सकाळ
शुक्रवार, 12 मे 2017

राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा; जनतेचे भोग!
अरुण जेटली हे आजही देशाचे अर्थमंत्री व संरक्षणमंत्री आहेत. देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री अद्याप तरी मिळाला आहे काय, याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. इतक्या मोठय़ा देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री सापडू नये हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबाच म्हणायला हवा. अर्थात हे कर्म जनतेचेच आहे व त्या कर्माचे फळ आमच्या सैनिकांना भोगावे लागत आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

मुंबई : शेतकऱ्यांच्या व जवानांच्या बाबतीत सरकारचे लोक ज्या ढिलाईने आणि मस्तवालपणे वागत आहेत तो सर्व प्रकार पाहता या देशात राज्यकर्त्यांचा मानसिक घोटाळा झाला आहे व त्या घोटाळ्यात देश पूर्ण फसला आहे, अशी टीका शिवसेनेने मोदी सरकारवर केली आहे.  

"देशाचे तारणहार असल्याच्या भूमिकेत आज जे वावरत आहेत त्यांना शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही व जवानांच्या हत्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दबलेल्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत," अशा शब्दांत मर्मावर बोट ठेवत सत्तेतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेनेच मोदी सरकारच्या नाकर्तेपणाचे आरोप केले आहेत. पक्षाचे मुखपत्र 'सामना'मधून ही टीका शिवसेनेने केली आहे. 

देशाची बेअब्रू, लष्काराला आव्हान
शिवसेनेने म्हटले आहे की, 'कश्मीर खोऱयात सध्या जे सुरू आहे ते आपल्या देशाच्या सार्वभौमतेला काळिमा फासणारे आहे. कश्मीरचेच सुपुत्र असलेल्या उमर फय्याज या लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण करून हत्या करणाऱया दहशतवाद्यांनी भारताच्या लष्करालाच आव्हान दिले आहे. काही दिवसांपूर्वीच आमच्या दोन जवानांची मुंडकी पाकडय़ा सैनिकांनी उडवून देशाची बेअब्रू केली. 

सरकारचे नक्राश्रू
सैनिकांच्या शिरच्छेदाचा बदला घेऊ हे इशारे हवेत विरण्याआधीच बुधवारी लेफ्टनंट उमर फय्याज यांचे अपहरण व नंतर हत्या करून त्यांचा छिन्नविच्छिन्न देह फेकून देण्यात आला. नेहमीप्रमाणेच सरकारने या हत्येचा निषेध केला आहे. हे कृत्य भ्याडपणाचे असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे नक्राश्रू ढाळले गेले आहेत, अशा शब्दांत दहशतवादाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने सरकारचे वाभाडे काढले आहेत. 

पाकिस्तानचे जिहादी 'तत्त्वज्ञान'!
काश्मिरातील तरुणांनी भारतीय लष्कराशी लढायचे, भारतीय जवानांचे प्राण घ्यायचे, भारतीय लष्करावर दगडफेक करायची हे पाकिस्तानचे जिहादी तत्त्वज्ञान अलीकडच्या काळात कश्मीरात पुन्हा वेगाने फोफावू लागले आहे. उमर फय्याजने हा चुकीचा मार्ग तर निवडला नाहीच, उलट दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठीच तो लष्करात दाखल झाला. म्हणूनच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. कश्मीर खोऱ्यातील तरुणांचे ‘रोल मॉडेल’ म्हणून उमर फय्याज यांची ओळख होती, सामनामध्ये म्हटले आहे.

Web Title: modi govt has psychological issue, says shiv sena