
Kumar Ketkar : 2024 मध्ये मोदींचं सरकार येईल आणि आपण…कुमार केतकर यांनी खडे बोल सुनावले
डोंबिवली - काँग्रेस पक्ष हा पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांचा पक्ष आहे. त्यांची लोकप्रियता आपल्यापेक्षा जास्त आहे. ते प्रत्येक ठिकाणी वेळेवर यायचे. आपल्याला देखील वेळ पाळावी लागेल नाहीतर 2024 मध्ये मोदींचं सरकार येईल आणि त्याच्यानंतर आपण दोन तासांनी पोहोचू. असे खडे बोल सुनावत काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्थानिक नेत्यांचे कान टोचले.
डोंबिवलीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या वतीने हाथ से हाथ जोडो अभियानचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी आयोजित या कार्यक्रमस्थळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काही स्थानिक पदाधिकारी तब्बल दोन तास उशिराने पोहोचले. या कार्यक्रमास खासदार कुमार केतकर हे देखील उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होताच कुमार केतकर यांनी लेट लतिफ नेत्यांचे कान टोचले.
केतकर म्हणाले, पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींची लोकप्रियता नक्कीच नाना पटोले आणि कुमार केतकर यांच्यापेक्षा जास्त होती तरीदेखील ते प्रत्येक ठिकाणी वेळेवर यायचे. त्यामुळे याच्यापुढे कायम वेळ पाळावी लागेल. नाहीतर 2024 मध्ये मोदींचं सरकार येईल आणि त्याच्यानंतर आपण दोन तासांनी पोहोचू. असे बोलतं खासदार कुमार केतकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि स्थानिक नेत्यांचे कान टोचले.
खासदार कुमार केतकर म्हणाले, 2024 ला असा टाईम टेबलचा घोटाळा करून चालणार नाही. 2024 ची निवडणूक आपल्याला जिंकायची असेल तर आपल्याला आजपासून दररोज टाईम टेबल पाळावं लागेल. ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या शपथा घेतल्या ते सगळे काँग्रेस पक्ष सोडून गेले. आपल्यापैकी कोणी सोडून गेलं नाही, आपल्या कोणाच्याही घरी ईडी, सीबीआयवाले आले नाहीत कारण आपण काही केलेलं नाही.