esakal | Cruise Party: नवाब मलिकांवर १०० कोटींचा दावा दाखल करणार - मोहित कंबोज
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik and Mohit Kamboj

नवाब मलिकांवर १०० कोटींचा दावा दाखल करणार - मोहित कंबोज

sakal_logo
By
सुधीर काकडे

मुंबई जवळ समुद्रात सुरू असणाऱ्या क्रुझ पार्टीवर एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. या कारवाईत काही लोकांना अमली पदार्थांसह अटक केली असून, प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात सहभागी आहे. त्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणात भाजपचा संबंध असल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याचं सांगत मोहित कंबोज यांच्यावर देखील काही आरोप करण्यात आले होते. कंबोज यांनी आता या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे. यावेळी त्यांनी मानहाणी केल्या प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर १०० कोटींचा दावा दाखल करु असे म्हणत मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावरून देखील प्रश्न उपस्थित केले.

क्रुझ पार्टीवर झालेल्या कारवाईतील काही लोकांना सोडण्यात हात असल्याचा आरोप कंबोज यांनी फेटाळून लावला आहे. "माझ्यावर आरोप लावले की NCB च्या रेड मध्ये काही लोकांना वाचवण्यात माझा सहभाग आहे. मात्र तसे नसून तपासणी दरम्यान काहीही न सापडल्यानं अनेकांना एनसीबीनं सोडून दिलं.रिषभ सचसेव माझा मेव्हणा आहे. माझ्या 31 वर्षांच्या मेव्हण्यावर मला गर्व आहे की इतक्या मोठ्या यंत्रणेच्या तपासणीतून क्लीन होऊन बाहेर पडला." असं यावेळी कंबोज यांनी सांगितलं.

हेही वाचा: "...म्हणून त्यांना सोडलं"; NCBचं नवाब मलिकांच्या आरोपांना उत्तर

'माझ्याकडे पक्षाचं कोणतंही पद नाही, मी ऍक्टिव्ह पॉलिटिक्स पासून दीड वर्ष दूर आहे.' असं कंबोज यांनी यावेळी सांगितलं. तसेच नवाब मलिक यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. नवाब मलिकांकडे रिषबशी संबंधित पुरावे आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत मलिक हे सत्तेचा दुरूपयोग करत आहेत असा आरोप खंबोज यांनी केला. उलट नवाब मलिक आपल्या पदाचा गैरवापर करुन ड्रग पॅडलिंग प्रकरणात सहभागी असलेल्या आपल्या जावयाला वाचवण्यासाठी आपल्या खुर्चीचा वापर करत आहेत असा आरोप यावेळी खांबोज यांनी केला. नवाब मलिक हे कचऱ्याचा धंदा करतात त्यांनी आता कचरा फेकून द्यावा अशी टीका देखील कंबोज यांनी यावेळी केली.

loading image
go to top