
Mohit Kamboj : 'पहाटेपर्यंत बारमध्ये मोहित कंबोज होते', संभाजी ब्रिगेडचा दावा; गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुंबईः एका बारमध्ये पहाटेपर्यंत एक भाजप नेता उपस्थित होता. पोलिसांना त्याने हुज्जत घातली, असं ट्विट संजय राऊत आणि अतुल लोंढे यांनी व्हीडिओसह केलं होतं.
याप्रकरणी आता संभाजी ब्रिगेडचे संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांनी तो भाजप नेता मोहित कंबोज असल्याचा दावा केला आहे. कंबोज यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.
खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विटमध्ये एक व्हीडिओ शेअर करुन तो एक भाजप नेता असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये सदरील व्हीडिओ पाहटे साडेतीन वाजताचा असल्याचं सांगून कायद्याचे धिंडवडे उडवले जात असल्याचा आरोप केला आहे.
संजय राऊत ट्विटमध्ये म्हणतात, '' पहाटे 3.30. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? शेवटपर्यंत पहा. पोलिस हतबल आहेत.. हे तर काहीच नाही.. कायद्याचे धिंडवडे काढणारे फुटेज मी पोलिस आयुक्तांना पाठवत आहे.. मी वाट पाहतोय पोलिस काय कारवाई करत आहेत.. हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले आहे.''
काही वेळापूर्वी संभाजी ब्रिगेडचे संघटनाप्रमुख सचिन कांबळे खार पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मोहित कंबोज यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी आल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं.
कांबळे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात असणाऱ्या मोहित कंबोज यांच्यावर एफआयआर दाखल करावा, मी त्या दिवशी स्वतः तिथे उपस्थित होतो. मोहित कंबोज हे नशा करुन होते आणि तरुणी नाचत होत्या, असा दावा कांबळे यांनी केला आहे.