मराठवाडा, विदर्भात दक्षिण भागात मॉन्सून दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

शुक्रवारी (ता. 21) राज्यात थोडीशी चाल करत सांगलीपर्यंत धाव घेणारा मॉन्सून शनिवारी (ता. 22) मध्य महाराष्ट्रातील सोलापूरचा काही भाग व्यापत, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिण भागात दाखल झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता. 25) मॉन्सून सर्व राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी (ता. 20) कोकणात दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मॉन्सूनने सलग तिसऱ्या दिवशी प्रगती सुरूच ठेवली आहे.  शुक्रवारी (ता. 21) राज्यात थोडीशी चाल करत सांगलीपर्यंत धाव घेणारा मॉन्सून शनिवारी (ता. 22) मध्य महाराष्ट्रातील सोलापूरचा काही भाग व्यापत, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिण भागात दाखल झाला आहे. मंगळवारपर्यंत (ता. 25) मॉन्सून सर्व राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. यामुळे वाऱ्यांचा वेग तर मंदावलाच तसेच बाष्पही ओढून नेल्याने पाऊसही लांबला. वादळ निवळल्यानंतरही अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह मंदच असल्याचे दिसून आले आहे. मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन लांबले.

केरळमध्ये आठवडाभर उशीराने येणाऱ्या मॉन्सूनने 14 जूनला दक्षिण कर्नाटकपर्यंतची वाटचाल पुर्ण केली. 20 जूनला दक्षिण महाराष्ट्रापर्यंतचा टप्पा गाठला. दोन दिवसांत पुढे प्रगती करत राज्याच्या आणखी भाग व्यापला. सुंपुर्ण पूर्व भारतात मजलमारून आता उत्तरेकडे वाटचाल सुरु केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon arrives in Marathwada and Vidarbha