केरळमध्ये तीन दिवस आधीच आगमन 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 मे 2018

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज केरळमध्ये दाखल झाले. मॉन्सूनने केरळचा बहुतांश भाग व्यापला असून, तमिळनाडूच्या दक्षिण भागात हजेरी लावल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. पुढील वाटचालीस पोषक स्थिती असल्याने गुरुवारपर्यंत (ता. 31) मॉन्सून कर्नाटकपर्यंत धडक देण्याची शक्‍यता आहे. पावसाचा हा प्रवास विनाअडथळा सुरू राहिला, तर पुढील सात दिवसांत तो महाराष्ट्रात दाखल होईल. 

मॉन्सून सर्वसाधारणपणे एक जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र यंदा तो तीन दिवस आधी केरळात धडकेल, असे हवामान विभागाने आधीच जाहीर केले होते. हा अंदाज अचूक ठरवत मॉन्सून आज केरळमध्ये दाखल झाला. मॉन्सूनने अरबी समुद्र, केरळ, तमिळनाडूसह बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात प्रगती केल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. मॉन्सूनने केरळच्या कर्नुल, तमिळनाडूच्या कोईमतूर, कोडाईकॅनॉल, तुतिकोरीनपर्यंतचा भाग व्यापला आहे. 

गेल्या तीन ते चार दिवसांपासून केरळमध्ये पाऊस पडत आहे. या भागात ढगांची दाटी असून, वातावरणात जाणाऱ्या दीर्घ किरणोत्सारी लहरींच्या स्थितीचा विचार करून मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

कर्नाटकात गुरुवारपर्यंत? 
प्रगतीसाठी पोषक हवामान असल्याने गुरुवारपर्यंत (ता. 31) मॉन्सून कर्नाटकमध्ये पोचण्याची शक्‍यता आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात अशी दोन ठळक कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंतच्या 48 तासांमध्ये मॉन्सून मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये दाखल होण्यासाठी पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

Web Title: Monsoon arrives three days in Kerala already