मॉन्सूनची वाटचाल "जैसे थे' राहणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

हवामान खात्याचा अंदाज, कोकणात दाखल

हवामान खात्याचा अंदाज, कोकणात दाखल
पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या (मॉन्सून) सरी कोकण किनारपट्टीवर बरसण्यास रविवारी सुरवात झाली. तर, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. येत्या मंगळवारपासून (ता. 19) कोकणात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता असून, बुधवारपासून (ता. 20) या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक स्थिती नसल्याने आणखी काही दिवस मॉन्सूनची वाटचाल "जैसे थे' राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

मॉन्सूनचा प्रवाह मंदावला आहे. सुमारे आठ दिवसांपासून मॉन्सूनने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर आता कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या तुरळक सरी पडण्यास सुरवात झाली आहे. कोकण किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलके ढग जमा झाले होते. वसई, भिवंडी, देवगड, मालवण, सांताक्रूझ, गुहागर, तलासरी, ठाणे, डहाणू येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. घाटमाथ्यासह सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील जावळी मेढा, पाटण, लोणावळा, इगतपुरी आदी भागांत पावसाच्या हलक्‍या ते मध्यम सरी कोसळल्या. मराठवाडा आणि विदर्भात मात्र मुख्यत: कोरडे हवामान होते. येत्या सोमवारी (ता. 18) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्‍यता आहे.

शहरात पाऊस
शहर आणि परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाच्या सरींना सुरवात झाली. कात्रज, सिंहगड रस्ता, कोथरूड या भागांत पावसाचा जोर अधिक होता. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये शहरात 0.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभरात पावसाच्या दोन-तीन सरी पडल्या. त्यामुळे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. 1 जूनपासून आतापर्यंत 62.7 मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानाचा पारा 3.2 अंश सेल्सिअसने कमी होऊन 27.9 अंश सेल्सिअसची नोंद झाली.

Web Title: monsoon environment rain