मॉन्सूनचे प्रवाह मंदच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत
अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत असलेले ‘वायू’ चक्रीवादळ आता निवळले आहे. सोमवारी (ता. १७) किनारपट्टीलगतच्या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र होते. रात्री उशिरापर्यंत हे क्षेत्र गुजरातच्या किनाऱ्यावर पोचण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्रातील ही प्रणाली निवळून जाताच बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात शनिवारपर्यंत (ता. २२) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

पुणे - अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. मॉन्सूनच्या अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह अद्यापही मंदच असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत (ता. २१) लांबण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनने दक्षिण कर्नाटकपर्यंतची वाटचाल पूर्ण केली असून, सोमवारी (ता. १७) प्रगतीची सीमा कायम होती. रविवारी (ता. १६) मॉन्सूनने संपूर्ण ईशान्य भारत व्यापला असून, पूर्व भारतातील सिक्कीम, पश्चिम बंगालच्या काही भागांत मॉन्सून पोचला आहे.  

केरळमध्ये यंदा आठवडाभर उशिराने येणाऱ्या मॉन्सूनचे महाराष्ट्रातील आगमनही खूपच लांबले आहे. साधारणत: ७ जूनपर्यंत तळकोकणात, १० जूनपर्यंत पुणे, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांशी भागात तर १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापणारा मॉन्सून राज्यापासून फारच दूर आहे. सुरवातीपासून अडखळणाऱ्या मॉन्सूनला वायू चक्रीवादळामुळे अडथळा निर्माण झाला. शुक्रवारी (ता. १४) थोडीशी चाल करत, दक्षिण कर्नाटकच्या मंगळूर, म्हैसूर, तमिळनाडूतील सालेम, कुड्डालोरपर्यंत पोचलेला मॉन्सून अद्यापही तेथेच रंगाळला आहे. मॉन्सूनचे प्रवाह बळकट होऊन, महाराष्ट्रात पोचण्यासाठी शुक्रवारपर्यंत (ता. २१) वाट पहावी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हलक्या पावसाचा अंदाज
‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे. आजपासून (ता.१८) कोकणात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon Environment Rain Vayu Storm Effect