मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला

प्रतिनिधी
सोमवार, 24 जून 2019

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. २३) मोठा पल्ला गाठत महाराष्ट्राचा जवळपास निम्मा भाग व्यापला आहे.

पुणे -  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता. २३) मोठा पल्ला गाठत महाराष्ट्राचा जवळपास निम्मा भाग व्यापला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात प्रगती करत मॉन्सूनने नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल मारली आहे. कोकणात मात्र मॉन्सून रत्नागिरीपर्यंतच रेंगाळला आहे. येत्या ४८ तासांमध्ये मॉन्सून उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  

राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी (ता. २०) कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मॉन्सूनने सलग चौथ्या दिवशी प्रगती सुरूच ठेवली आहे. शनिवारी (ता. २२) मध्य महाराष्ट्रातील सोलापूरचा काही भाग व्यापून मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिण भागात दाखल झाला. रविवारी (ता. २३) मॉन्सूनने मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा आणखी काही भाग, मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापला. मात्र, गुरुवारी (ता. २०) रत्नागिरीपर्यंतची वाटचाल जैसे थे आहे. पुढील वाटचाल वेगाने होत, मंगळवारपर्यंत (ता. २५) मॉन्सून सर्व राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

केरळात यंदा आठवडाभर उशिराने आलेल्या मॉन्सूनच्या वाटचालीवर अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे परिणाम झाला. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावलाच, तसेच बाष्प ओढून नेल्याने पाऊसही लांबला. महाराष्ट्रातील आगमन उशिराने होत १९७२ नंतर यंदाही मॉन्सून तळ कोकणात पोचण्यासाठी २० जूनपर्यंतची वाट पाहावी लागली. त्यानंतर मात्र मॉन्सूनचा उत्तरेकडील प्रवास वेगाने होत आहे. पश्चिम भागापेक्षा पूर्व भारतातून मॉन्सूनचा प्रगतीचा वेग अधिक आहे. शनिवारी (ता. २२) कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार ही राज्य संपूर्ण व्यापून, छत्तीसगड, उत्तर प्रदेशाच्या काही भागापर्यंत मजल मारली. तर रविवारी (ता. २३)पूर्व उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांत वाटचाल केली. पोषक हवामान असल्याने मंगळवारपर्यंत दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशाच्या काही भागांपर्यंत मॉन्सून पोचण्याची शक्यता आहे.

राज्यातील पाऊस दृष्टिक्षेपात...
 मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पावसाची हजेरी; चार मंडळांत अतिवृष्टी
 नगर जिल्ह्यातील ११ महसूल मंडळांत जोरदार पाऊस; कोपरगाव सर्वाधिक
 नाशिक जिल्ह्यात येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यांत 
दमदार पाऊस
 कोल्हापूरच्या पश्‍चिम भागातील गगनबावडा, भुदरगड, कागलमध्ये 
मुसळधार सरी 
 वऱ्हाडात बुलडाणा, वाशीम, अकोला जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस

तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यता
राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन झाल्यानंतर राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार असून, हलक्या पावसाचा अंदाज असून, पुणे परिसरातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon occupies half of Maharashtra