मराठवाड्यात मॉन्सूनची वर्दी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जून 2019

राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला काल दिलासा मिळाला. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. 

औरंगाबाद/नागपूर - राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याला काल दिलासा मिळाला. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या आहेत. आज (ता.२३) राज्यात सर्वदूर पाऊस जोर धरणार असून, अनेक ठिकाणी मुसळधारेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.    

यंदा मॉन्सूनचे आगमन खूपच लांबल्याने दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला चांगल्या पावसाची ओढ लागली आहे. मृग नक्षत्र संपून सूर्याचा शनिवारी आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होताच मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांत पावसाला सुरवात झाली. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात हलका ते जोरदार पाऊस झाला. अनेक दिवसांच्या खंडानंतर पाऊस आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. याआधीच्या पावसात लागवड केलेल्या कपाशी पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे. खरिपाच्या रखडलेल्या पेरण्या सुरू होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा जिल्ह्यात; तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.

लातूर जिल्ह्यात आज पहाटेपर्यंत सर्वदूर पाऊस झाला.   पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात गर्दी केली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, मानवत, सेलू आणि गंगाखेड तालुक्‍यात आज पहाटेपासून सर्वदूर हलका पाऊस झाला. सरासरी ६.८१ मिलिमीटर नोंद झाली. आतापर्यंत सरासरीच्या १२६ मिलिमीटर पावसाची गरज होती. त्यापैकी केवळ ३१.२६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट शहर व परिसर, बिलोली तालुका, कंधारमधील फुलवळ, तर देगलूरच्या हाणेगाव, नांदेड शहर व परिसरात रिमझिम झाली. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोलीसह कळमनुरी, वसमत, औंढा तालुक्‍यातील काही गावांत तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जालन्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. 

केरळात यंदा आठवडाभर उशिराने आलेल्या मॉन्सूनच्या वाटचालीवर अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे परिणाम झाला. महाराष्ट्रातील आगमन उशिराने होत १९७२ नंतर यंदाही मॉन्सून तळ कोकणात पोचण्यासाठी २० जूनपर्यंतची वाट पाहावी लागली. त्यानंतर मात्र मॉन्सूनचा उत्तरेकडील प्रवास वेगाने होत आहे. शनिवारी (ता. २२) मॉन्सूनने मध्य महाराष्ट्रातील सोलापूरचा काही भाग, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा दक्षिण भाग, विदर्भातील ब्रह्मपुरीपर्यंतचा भाग व्यापला आहे.

पूर्व भारतातून वेग अधिक
यंदा पश्चिम भागापेक्षा पूर्व भारतातून मॉन्सूनचा प्रगतीचा वेग अधिक आहे. दोन दिवसांत मॉन्सूनने मोठा पल्ला गाठला असून, शनिवारी कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार ही राज्य संपूर्ण व्यापून, छत्तीसगड, उत्तर प्रदेशाच्या काही भागापर्यंत मजल मारली आहे. वाटचालीस पोषक हवामान असल्याने मंगळवारपर्यंत दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशाच्या काही भागापर्यंत मॉन्सून पोचेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

मंगळवारपर्यंत राज्य व्यापण्याची शक्यता
पुणे : राज्यात दाखल होताच मॉन्सूनने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. मॉन्सूनने सलग तिसऱ्या दिवशी प्रगती सुरूच ठेवली आहे. शुक्रवारी (ता. २१) सांगलीपर्यंत धाव घेणारा मॉन्सून आज मध्य महाराष्ट्रातील सोलापूरचा काही भाग व्यापून मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिण भागात दाखल झाला. मंगळवारपर्यंत (ता. २५) मॉन्सून सर्व राज्य व्यापण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: monsoon rain in marathwada