चारशे गावांचा संपर्क तुटला

monsoon rains state
monsoon rains state

पुणे-  मॉन्सूनच्या पावसाने राज्यात चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असून, उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. बुधवारी (ता. ४) काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला.

मुंबईसह कोकणात पावसाने दणादाण उडवून दिली आहे. कोयनेतून होणारा विसर्ग वाढला असून, त्यामुळे कृष्णेकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चारशेपेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आहे.

पावसाने मुंबईला आज चांगलेच झोडपून काढले. मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठावरील भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांतिनगर पाण्याखाली गेले असून, ‘एनडीआरएफ’च्या पथकाने बचावकार्य हाती घेतले आहे. दुपारपर्यंत १३०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. 

कोकणात मुसळधार
रायगडमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी १५० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुण्यातून एनडीआरएफची दोन पथके पनवेलमध्ये दाखल झाली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून राजापूर, संगमेश्‍वर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. सावित्री, जगबुडी, बावनदीसह काजळी, अर्जुना, कोदवली या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरीवर सरी कोसळत असून, अनेक नद्यांना पूर आला आहे. भुईबावडा (ता. वैभववाडी) घाटात दरड कोसळली  असून, खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या मार्गावरील वाहतूक करूळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून, तिलारी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

कोयनेतून विसर्ग वाढला
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पातळी २२ फूट दहा इंच होती, कोयना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असून, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे, वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव बंधारे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड हा बंधारा पाण्याखाली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यात पावसाची गरज आहे. 

पुणे जिल्ह्यात नद्यांना पूर
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्व धरणे भरली असल्याने पावसाचा जोर वाढताच धरणातून पाणी सोडावे लागत आहे. बुधवारी सकाळी खडकवासला, मुळशी, पवना, वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुळा, मुठा, पवना, नीरा, भीमा, इंद्रायणी, भामा या नद्यांना पूर आला आहे. उजनी धरणही शंभर टक्के भरल्याने या धरणातून विसर्ग करावा लागणार आहे. 

पर्लकोटा नदीला पूर
पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असून, पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्यातील २०० गावांचा संपर्क पाण्यामुळे तुटला आहे. पर्लकोटा, पामलगौतम, प्राणहिता यासह अनेक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पूरस्थिती गेल्या दोन दिवसांपासून कायम आहे. शेकडो घरे आणि वस्त्यांमध्येदेखील पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली. अमरावती जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. नागपुरातदेखील बुधवारी मुसळधार पाऊस झाला.

विजेचा धक्का; घाटकोपरला चेंगराचेंगरी
रुळांवर पाणी साचल्याने प्रवाशांना लोकलमधून खाली उतरून पाण्यातून वाट काढावी लागली. सिग्नलजवळ अनेक प्रवाशांना कमी दाबाचा विजेचा झटका बसला. सायंकाळच्या सुमारास घाटकोपर, अंधेरी स्थानकांत लोकलमध्ये चढताना चेंगराचेंगरी झाली. रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवाशांनी रेल्वे अधिकारी आणि पोलिसांना घेराव घालून संताप व्यक्त केला. कुर्ला-सायनदरम्यान अडकलेल्या ४,५०० प्रावाशांची रेल्वे सुरक्षा बलाने सुटका केली. घाटकोपर स्थानकात सहा तासांनंतर कुर्ल्याहून ठाण्यासाठी लोकल येताच प्रवाशांनी लोकलमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली. मात्र, पोलिस आणि प्रवाशांच्या सहकार्यामुळे हा अनर्थ टळला.

२०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे (स्रोत : हवामान विभाग) : 
खालापूर २६८, माणगाव २६०, रोहा २५७, डुंगरवाडी २५०, भामरागड २४३, धारावी २४०, उरण २३०, खोपाली २३०, लोणावळा २२०, दावडी २००.

  विदर्भ
 गडचिरोली शहरात शेकडो घरांमध्ये पाणी शिरले
 एटापल्ली तालुक्‍यात ७०हून अधिक गावांना पाण्याने वेढले
 मेळघाट परिसरात संततधार 
 सिपना नदीला आलेल्या पुरामुळे ३० गावांचा संपर्क तुटला
 वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, कारंजा, आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, खरांगणा गावांत पावसाचा कहर

  मुंबई
 नवी मुंबईत आठ तासांत तब्बल २२५.९२ मिमी विक्रमी पाऊस
 पनवेल, उरण परिसरातील शेकडो घरांत पाणी शिरले
 डुंगी गाव पुन्हा पाण्यात गेल्याने ग्रामस्थांकडून गणेशमूर्तींचे विसर्जन

  रायगड 
  अंबा नदीला पूर आल्याने नागोठण्यात जनजीवन विस्कळित
 महाडमधील सावित्री, गांधारी, काळ नद्या धोक्‍याच्या पातळीवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com