राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक जिल्ह्यात दूषित पाणी !

दिलीप कुऱ्हाडे
शनिवार, 28 एप्रिल 2018

राज्यातील वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक 27 टक्के, हिंगोलीमध्ये 24 टक्के आणि चंद्रपूर मध्ये 21 टक्के पिण्याचे पाणी दूषित आहे. औरंगाबाद, नांदेड, रायगड मध्ये प्रत्येकी वीस टक्के पिण्याचे पाणी दूषित आहे. अकोला, बुलडाणा, यवतमाळ, जालना, गोंदिया, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंधरा टक्के पाणी दुषित आहे. तर नागपूर, भंडारा, ठाणे, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद परभणी, अमरावतीे, लातूर जिल्ह्यात साधारणत: दहा टक्के पिण्याचे पाणी दूषित आहे.

पुणे : राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहीर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्यात सर्वाधिक 27 टक्के दूषित पाणी वाशिममध्ये आढळले आहे. तर हिंगोली 24 टक्के तर चंद्रपूर 21 टक्के असल्याचे राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीत आढळले आहे.

प्रत्येकाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. मात्र महानगरपालिका, नगरपरिषदा असो कि ग्रामपंचायत नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यास असर्मथ असल्याचे राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या मार्च महिन्याच्या अहवालात दिसून येते. दूषित पाणी पिण्यासाठी वापरल्यामुळे पटकी, कावीळ, विषमज्वर, अतिसार अशा जलजन्य साथरोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे संबंधित यंत्रणा स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबरोबर साथरोगाला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

राज्यातील वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक 27 टक्के, हिंगोलीमध्ये 24 टक्के आणि चंद्रपूर मध्ये 21 टक्के पिण्याचे पाणी दूषित आहे. औरंगाबाद, नांदेड, रायगड मध्ये प्रत्येकी वीस टक्के पिण्याचे पाणी दूषित आहे. अकोला, बुलडाणा, यवतमाळ, जालना, गोंदिया, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंधरा टक्के पाणी दुषित आहे. तर नागपूर, भंडारा, ठाणे, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद परभणी, अमरावतीे, लातूर जिल्ह्यात साधारणत: दहा टक्के पिण्याचे पाणी दूषित आहे. तर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, नंदूरबार, वर्धा, गडचिरोली, धुळे,जळगाव या जिल्ह्यात पाच टक्क्यापेक्षा कमी पिण्याचे पाणी दूषित असल्याचे राज्य प्रयोगशाळेच्या अहवालात नूमद केले आहे. 

‘‘शहर व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे साठे निर्जंतुक व पिण्यास योग्य राहतील याची खबरदारी घेण्याविषयी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नये. पिण्याच्या पाण्यात मेडिक्लोर किंवा तुरटीचा वापर करावा.’’
- डॉ. सुहास बाकरे, उपसंचालक आरोग्य सेवा, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा,पुणे 

ठाणे महानगरपालिका हद्दीत तेरा टक्के पिण्याचे पाणी दूषित
राज्यातील महापालिका हद्दीत पुणे शहर व पिंपरी-चिंचवड एक टक्का, नाशिक व नगर दोन टक्के, औरंगाबाद बारा,सोलापूर व कोल्हापूर चार टक्के, नांदेड नऊ टक्के नागपूर अकरा टक्के तर ठाण्यात तेरा टक्के पिण्याचे पाणी दूषित अाहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than of half districts in Maharashtra face dirty water issue