गनिमीकाव्यामुळे आंदोलन यशस्वी - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

भवानीनगर - ‘‘मला माहिती होते, फक्त गुजरातमधूनच दूध येऊ शकते. मग मी रेल्वे स्थानकावरच बसून राहिलो. संसदेचे अधिवेशन असल्याने मला अटक करायला सभापतींचीच परवानगी लागणार होती. त्यामुळे बिनधास्त होतो. सरकार आंदोलन चिरडणार होते, हे माहिती होते. म्हणूनच आम्हीदेखील शिवाजीराजांच्या गनिमीकाव्यानेच लढलो आणि यशस्वी झालो...’’ अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी दूध आंदोलनाचा प्रवास मांडला.

भवानीनगर - ‘‘मला माहिती होते, फक्त गुजरातमधूनच दूध येऊ शकते. मग मी रेल्वे स्थानकावरच बसून राहिलो. संसदेचे अधिवेशन असल्याने मला अटक करायला सभापतींचीच परवानगी लागणार होती. त्यामुळे बिनधास्त होतो. सरकार आंदोलन चिरडणार होते, हे माहिती होते. म्हणूनच आम्हीदेखील शिवाजीराजांच्या गनिमीकाव्यानेच लढलो आणि यशस्वी झालो...’’ अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी दूध आंदोलनाचा प्रवास मांडला.

भवानीनगर येथे पृथ्वीराज जाचक यांनी आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात बोलताना राजू शेट्टी यांनी दूध आंदोलन कसे यशस्वी झाले, याची कहाणी सांगितली. ते म्हणाले, ‘‘राज्य सरकारने पोलिसांना सर्वतोपरी हे आंदोलन चिरडून टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. दूध हे कसेबसे २४ तास टिकते, त्यानंतर त्यात बॅक्‍टेरिया वाढतात, याचे पक्के गणित मनात होते. त्यामुळे फक्त चार दिवस दूध उत्पादकांनी संयम ठेवला, तरी सरकारला गुडघे टेकायला लावू, असा आत्मविश्‍वास होताच. फक्त मोठ्या शहरांत टंचाई निर्माण झाली की सरकार नमणार, याची खात्री होती. पण समोरासमोरचे आंदोलन यशस्वी होणार नव्हते. त्यामुळे मार्ग रोखण्याचा फंडा आखला. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर या मोठ्या शहरांमध्ये गोव्याचा रस्ता सोडला तर बंगलोर, सोलापूर, नाशिक या राष्ट्रीय महामार्गाने व गुजरातमधून रेल्वेने दूध येऊ शकत होते. यापैकी गोवा सोडला तर बाकी तीनही महामार्ग आम्ही रोखले होते.’’ 

‘‘गुजरातमधून सरकार दूध आणू शकते, याची खात्री असल्याने डहाणू, पालघरमध्ये थांबलो. तिथे कार्यकर्ते नव्हते. मात्र समृद्धी महामार्गाच्या आंदोलनात आम्ही मदत केली. त्याबदल्यात तेथील आदिवासी आमच्या मदतीला आले. तरीही आम्ही फक्त चौघांनी गुजरातमधून आलेले ४२ टॅंकर दूध अडवले. हे दूध आम्ही जवळपास ४२ तास अडवले. पोलिस प्रयत्न करीत होते. आम्ही टॅंकर सोडल्यावर पोलिस खूष झाले. मात्र ४२ तासांच्या विलंबामुळे दूध पोचविल्याचे समाधान काही त्यांना मिळाले नाही. त्यानंतर गुजरातमधून ‘अहिंसा एक्‍स्प्रेस’ला १२ डबे जोडून दूध पाठविणार, याची माहिती मिळाली. त्यामुळे मी तेथेच थांबलो. ‘माझ्यावरून रेल्वे न्यावी लागेल,’ असा निर्वाणीचा दिलेला इशारा आणि मला त्वरित अटक करता येत नसल्याच्या तांत्रिक मुद्द्यांमुळे येथेही दुधाचे डबे जोडता आले नाहीत आणि तेथेच गुजरातच्या मुद्द्याला टर्निंग पॉइंट मिळाला. कोठूनच दूध आणता येणार नव्हते. तसेच राज्यातील महिला शेतकरी या वेळी खंबीर होत्या. त्यांची मोठी साथ लाभल्याने सरकार नमले. हे सारे प्रकार लोकशाहीत चुकीचे असले, तरी त्याशिवाय अलीकडे सरकार ऐकतच नाही, काय करायचे,’’ असा सवाल शेट्टी यांनी केला.

Web Title: Movement successful says Raju Shetty