मोदी सरकार मुस्लिम-दलितविरोधी : ओवेसी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

तलाकच्या मुद्दयावर पंतप्रधान मुस्लिम महिलांचे तारणहार असल्याचा आव आणत आहेत, तर जम्मूमध्ये आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचारावर बोलायला वेळ मिळत नाही’, असे म्हणत या दुटप्पी धोरणाचा खरपूस समाचार त्यांनी घेतला.

उमरखेड (जि.  यवतमाळ) : ‘मोदी सरकार मुस्लिम समाजाला शरियतपासून दूर नेण्याचे षड्यंत्र रचत आहे, तर दलितांना त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे. यासाठी दलित व मुस्लिम बांधवांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, असे आवाहन ‘एएमआयएम’चे अध्यक्ष खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी केले.

येथील गफूर शहा मैदानावर शुक्रवारी (ता.13) आयोजित जाहीर सभेत खासदार ओवेसी बोलत होते. यावेळी मंचावर आमदार इम्तियाज जलील (औरंगाबाद), मुफ्ती असफाक कासमी (अकोला), इरफान भाई, नगरसेवक मुजीब बागवान, जलील कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना ओवेसी यांनी मोदी-योगी सरकारसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षावरही जोरदार प्रहार केला. 

‘तलाकच्या मुद्दयावर पंतप्रधान मुस्लिम महिलांचे तारणहार असल्याचा आव आणत आहेत, तर जम्मूमध्ये आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचारावर बोलायला वेळ मिळत नाही’, असे म्हणत या दुटप्पी धोरणाचा खरपूस समाचार त्यांनी घेतला. केंद्र शासनाच्या या धोरणाविरुद्ध ज्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत, त्यांचे अभिनंदन केले. मुस्लिम समाजाला राष्ट्रीय प्रवाहात येण्यासाठी शिक्षणाची कास धरावी’, असे आवाहनही त्यांनी केले. तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर केंद्र सरकार जो त्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा कायदा बनवत आहे, त्याचा निषेध त्यांनी करीत मुस्लिम समाजाला शरियतपासून दूर नेण्याचे, दलितांसाठी आवश्यक ऑट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये शिथिलता आणण्याचे प्रयत्न विद्यमान सरकार करीत आहे. म्हणून मोदी सरकार हे गरिबांचे नाही, तर धनिकांचे सरकार आहे’, असेही ते म्हणाले. 

मजलिस पक्षाला भाजपचे समर्थक असल्याचा आरोप करीत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करावे, असे सांगून ओवेसी म्हणाले की, ‘संसदेत जेव्हा तलाकवर चर्चा सुरू होती, त्यावेळी कोणत्याही धर्मनिरपेक्ष म्हणविणार्‍या पक्षांनी किंवा त्या पक्षातील मुस्लिम खासदारांनी आवाज का उठविला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करीत मुस्लिमांना एमआयएमसोबत राहण्याचे आवाहन केले.

येणार्‍या काळात दलित-मुस्लिम ऐक्य करून संधीसाधू पक्षांना दूर ठेवून आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करा, असा मौलिक सल्ला शेवटी उपस्थितांना त्यांनी दिला. यावेळी औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी जम्मूत अत्याचार करून मृत पावलेल्या आठवर्षीय बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: MP Ovaisi Criticizes Modi Govrernment