नवयुवकांनी आत्महत्येचे पाऊल उचलू नये : उदयनराजे भोसले

सिद्धार्थ लाटकर
Friday, 2 October 2020

मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र व भावनिक आहेत हे मान्य आहे. त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही असे खासदार उदयनराजे भाेसले यांनी नमूद केले आहे.

सातारा : महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सातारा जिल्ह्यात तर मराठा क्रांती माेर्चाच्यावतीने ठिकठिकाणी आंदाेलन, माेर्चा, विद्यार्थी परिषदा हाेत आहेत. दरम्यान राज्यातील मराठा समाजातील युवक अस्वस्थ झाले असून बीड जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त करुन राष्ट्राचे भविष्य असणाऱ्या नवयुवकांनी आत्महत्या यासारखे पाऊल उचलू नये असे आवाहन केले आहे.

उदयनराजे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ पाहणारा बीड जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील मराठा तरुण विवेक कल्याण राहाडे या बांधवाने आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली त्यांना आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत."

आली रे आली.. कऱ्हाड नंतर नागपूरच्या गुंडांची बारी आली!
 

उदयनराजेंच्या आरक्षण रद्द करा भुमिकेमुळे मराठा आंदोलनाची दिशा भरकटणार ? 

याचबरोबर, राहाडे परिवारासाठी ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. समाजातील नवयुवकांना आमचे आवाहन असेल. राष्ट्राचे भविष्य असणाऱ्या नवयुवकांनी असे पाऊल उचलणे हे राष्ट्राच्या व समाजाच्या दृष्टीने खूप हानिकारक आहे, असा धीर सोडून व टोकाचा निर्णय घेऊन चालणार नाही आणि यातून काही निष्पन्न होणार नाही, असेही राजेंनी नमूद केले आहे.

सातारकरांनाे.. माझे कुटुंब माझी जबाबदारी स्पर्धेत सहभागी व्हा अन् बक्षीस मिळवा

याशिवाय, मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र व भावनिक आहेत हे मान्य आहे. त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. आजची परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, तरी न्यायालयात मोठ्या ताकदीने आपण लढा देत आहोत. त्यामुळे विजय निश्चित आपला होईल, असा विश्वास उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Udayanraje Bhosale Appeals Maratha Community Youths Satara News